कुरखेडा : संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्ट शाखा कुरखेडा यांच्या वतीने संत निरंकारी सत्संग भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराला संत निरंकारी मिशनचे अनुयायी तसेच परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करून त्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला संत निरंकारी मंडळाचे झोनल इन्चार्ज किशन नागदेवे, कुरखेडा मंडळाचे प्रमुख माधवदास निरंकारी, भाजपा तालुकाध्यक्ष चांगदेव फाये, माजी नगराध्यक्ष रविंद्र गोटेफोडे, उद्योगपती गणपत सोनकुसरे, डॉ.अमित ठमके, अॅड.उमेश वालदे, तालुका आरोग्य अधिकारी सुजाता वाढवे, डॉ.जगदीश बोरकर, विनोद नागपूरकर, सिराज पठाण यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मा.आ.कृष्णा गजबे म्हणाले, ‘रक्तदान हे केवळ दान नसून गरजू रुग्णाला जीवनदान देण्याचे श्रेष्ठ मानवसेवेचे कार्य आहे. रक्ताची गरज कोणालाही, कधीही भासू शकते. अशा परिस्थितीत रक्तदात्यांनी केलेले रक्तदान अनेकांचे प्राण वाचविण्यासाठी मोलाचे ठरते. त्यामुळे प्रत्येक निरोगी नागरिकाने रक्तदानाबाबत जागरूक राहून अशा सेवाभावी उपक्रमांत सहभागी व्हावे,’ असे आवाहन मा.आ.गजबे यांनी केले.
संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून अध्यात्मासोबतच मानवसेवा, सामाजिक एकोपा आणि जनकल्याणाचे कार्य सातत्याने केले जात आहे. संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्टने आयोजित केलेला हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असून आयोजकांसह सर्व रक्तदात्यांचे त्यांनी अभिनंदन केले.
रक्तदानाच्या माध्यमातून मानवतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमामुळे परिसरात सामाजिक सेवेची भावना अधिक दृढ झाली.
































