Home दैनंदिन बातम्या जिल्हाधिकाऱ्यांची हत्ती कॅम्पला भेट रस्ते, पार्किंगसह कामांची पाहणी

जिल्हाधिकाऱ्यांची हत्ती कॅम्पला भेट रस्ते, पार्किंगसह कामांची पाहणी

ताटीगुडममध्ये रात्री गावकऱ्यांशी संवाद

अहेरीच्या महिला-बाल रुग्णालयात डॅाक्टरांशी चर्चा करताना जिल्हाधिकारी पंडा
ताटीगुडम येथे रात्री गावकऱ्यांकडून माहिती जाणून घेताना जिल्हाधिकारी पंडा

गडचिरोली : अहेरी तालुक्यात सुरू असलेली विविध विकासकामे दर्जेदार व निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासोबतच दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य, शिक्षण व इतर शासकीय सेवा प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी मंगळवारी दिल्या. अहेरी तालुक्याच्या दिवसभराच्या दौऱ्यात त्यांनी कमलापूरच्या हत्ती कॅम्पमधील पर्यटकांच्या सुविधांसह रुग्णालयातील आरोग्य सुविधा, महसूल प्रशासन, जलसंधारण, आदिवासी विकास विभागाच्या शैक्षणिक संस्था तसेच विविध पायाभूत विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रगतीचा आढावा घेतला. तसेच रात्री ‘सेवा संपृक्त अभियाना’अंतर्गत निवडलेल्या ताटीगुडम गावाला भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला. (खाली वाचा)

महिला व बाल रुग्णालयातील सुविधा, फायर ऑडिटचा आढावा
जिल्हाधिकारी पंडा यांनी अहेरी येथील महिला व बाल रुग्णालय तसेच उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन उपलब्ध आरोग्य सुविधा, पायाभूत सोयी आणि रुग्णालयाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांच्या उपलब्ध मनुष्यबळाची सद्यस्थिती त्यांनी जाणून घेतली. रुग्णालयात आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध असून डॉक्टरांची काही पदे रिक्त असल्याचे यावेळी निदर्शनास आले. रिक्त डॉक्टरांची पदे भरण्याबाबत वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी पंडा यांनी सांगितले. (खाली वाचा)

रुग्णालयातील रुग्ण व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने फायर ऑडिट करण्यात आले आहे का, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष विचारणा केली. तसेच विद्युत उपकरणे व विद्युत व्यवस्थेच्या सुरक्षा ऑडिटची सद्यस्थिती आणि त्यानुषंगाने आवश्यक अनुपालन करण्यात आले आहे का, याची माहिती घेतली. अग्निसुरक्षेशी संबंधित आवश्यक उपाययोजना, तसेच सुरक्षा ऑडिटमधील सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या. (खाली वाचा)

रुग्णालयाच्या इमारतीत पावसाळ्यात होणारी छताची गळती आणि आवश्यक किरकोळ दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. आरोग्यविषयक पायाभूत सुविधांची नियमित देखभाल करण्याबाबत डॉक्टर व संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या. (खाली वाचा)

रक्त संकलन युनिट लवकर कार्यान्वित करा
अहेरी रुग्णालयातील रक्त संकलन युनिटला प्रशासनाची मान्यता मिळाली असून ते लवकरात लवकर कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी सद्यस्थितीचा आढावा घेतला. युनिट सुरू करण्यासाठी काही प्रशासकीय अथवा तांत्रिक अडचणी आहेत का, याची माहिती घेऊन आवश्यक कार्यवाहीला गती देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. अहेरीसह परिसरातील दुर्गम भागातील नागरिकांना स्थानिक पातळीवर अधिक सक्षम आरोग्य सेवा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हे युनिट महत्त्वाचे ठरणार आहे. दुर्गम व आदिवासीबहुल भागातील नागरिकांना वेळेत व दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात, यासाठी आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर प्रशासनाचा भर असल्याचे जिल्हाधिकारी पंडा यांनी सांगितले. (खाली वाचा)

आलापल्लीतील संरक्षण भिंत व नाला सरळीकरणाची पाहणी
आलापल्ली परिसरात सुरू असलेल्या संरक्षण भिंत आणि नाला सरळीकरणाच्या कामांची जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. पावसाळ्यात पाण्याचा निचरा सुरळीत व्हावा तसेच संभाव्य पूरस्थितीमुळे नागरिकांचे नुकसान होऊ नये, या दृष्टीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची त्यांनी माहिती घेतली. कामांची गुणवत्ता कायम राखून ती निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या. (खाली वाचा)

त्यानंतर त्यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, अहेरी येथे आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांचा आढावा घेतला. योजनांची अंमलबजावणी, शैक्षणिक सुविधा तसेच विविध योजनांचा लाभ पात्र आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. (खाली वाचा)

आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाची पाहणी
दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी पंडा यांनी आलापल्ली ते सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गाचीही प्रत्यक्ष पाहणी केली. महामार्गाची सद्यस्थिती, रस्त्यावरील आवश्यक कामे तसेच वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या बाबींचा त्यांनी आढावा घेतला. नागरिकांना सुरक्षित व सुरळीत वाहतूक सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी आवश्यक कामांकडे प्राधान्याने लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. (खाली वाचा)

कमलापूर हत्ती कॅम्प परिसरातील कामांचा आढावा
सायंकाळी जिल्हाधिकारी पंडा यांनी कमलापूर हत्ती कॅम्प परिसराला भेट दिली. हत्ती कॅम्पकडे जाणाऱ्या मार्गावरील रस्त्यांची कामे, पार्किंगसह परिसरातील विविध पायाभूत कामांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. कामांची सद्यस्थिती व प्रगती जाणून घेऊन ती गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

ताटीगुडम येथे रात्री गावकऱ्यांशी संवाद
दिवसभराच्या दौऱ्यानंतर जिल्हाधिकारी पंडा यांनी रात्री ‘सेवा संपृक्त अभियाना’अंतर्गत निवड करण्यात आलेल्या ताटीगुडम गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी गावकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून गावातील शासकीय योजना व सेवांच्या उपलब्धतेबाबत माहिती घेतली. नागरिकांच्या अडचणी व अपेक्षा जाणून घेत त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.

दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध योजना आणि सेवा प्रभावीपणे पोहोचणे महत्त्वाचे असून, ‘सेवा संपृक्त अभियाना’अंतर्गत पात्र नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागप्रमुख व संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधून विकासकामांच्या प्रगतीसह नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या शासकीय सेवांचा आढावा घेतला. प्रलंबित कामांना गती देऊन दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय योजना व सेवा प्रभावीपणे उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी सहायक जिल्हाधिकारी अजय डोके, उपविभागीय अधिकारी प्रशांत पिसाळ, तहसीलदार बालाजी सोमवंशी, वनपरिक्षेत्र अधिकारी नारायण इंगळे, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी रमेश पेरगू यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.