Home पब्लिक प्रॉब्लेम इंदाराममध्ये काँग्रेसचा चक्काजाम; रस्त्यावरच्या खड्ड्यात धान रोवणी !

इंदाराममध्ये काँग्रेसचा चक्काजाम; रस्त्यावरच्या खड्ड्यात धान रोवणी !

देवलमरी मार्गावर वाहतूक ठप्प

अहेरी : तालुक्यातील अहेरी ते देवलमरी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांकडे संबंधित यंत्रणेचे लक्ष वेधण्यासाठी काल काँग्रेसच्या वतीने इंदाराम येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी रस्त्यावरच्या खड्ड्यांत धानाच्या रोपांची रोवणी करत प्रशासनाचा निषेध करण्यात आला. दोन तासांपेक्षा जास्त वेळ हे चक्काजाम आंदोलन सुरू होते.

देवलमरी मार्गावरील रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे 20 ते 25 गावांतील नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. वारंवार निवेदने देऊनही रस्त्याच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी यावेळी केला.

यावेळी घोषणाबाजी करत लक्ष वेधण्यात आले. चक्काजाममुळे बराच वेळ दोन्ही बाजुची वाहतूक खोळंबली होती. दरम्यान सा.बां.विभागाचे सहाय्यक अभियंता धम्मशिल रामटेके यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन चर्चा केली. खड्डे बुजविण्यासंदर्भात लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी अहेरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या नेतृ्त्वाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात होता.