Home राजकीय घडामोडी पदवीधर मतदारसंघाच्या धर्तीवर स्वतंत्र ‘शेतकरी मतदारसंघ’ असावा

पदवीधर मतदारसंघाच्या धर्तीवर स्वतंत्र ‘शेतकरी मतदारसंघ’ असावा

आझाद समाज पक्षाच्या मेळाव्यात ठराव

गडचिरोली : आझाद समाज पक्ष गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन येथील कात्रटवार सभागृहात केले होते. आगामी काळातील पक्षाची संघटनात्मक बांधणी, ग्रामपातळीवरील नागरिकांच्या प्रश्नांवर लढा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी याबाबत या संमेलनात सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघाच्या धर्तीवर स्वतंत्र शेतकरी मतदारसंघ निर्माण करावा, अशा मागणीचा ठराव यावेळी करण्यात आला.

या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश सचिव दिगंबर पलटणकर होते. प्रदेश युवा महासचिव संदीप मोरे व विदर्भ सचिव धर्मानंद मेश्राम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मुख्य मार्गदर्शक म्हणून जिल्हाध्यक्ष राज बन्सोड व जिल्हा प्रभारी विनोद मडावी, तसेच विशेष अतिथी म्हणून ॲड.कैलास जाधव, देवा साळवे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.प्रशांत सातार, चेतन काटेंगे, जिल्हा महासचिव अंकुश कोकोडे, संघटक हंसराज उराडे, सचिव प्रकाश बन्सोड उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष विवेक खोब्रागडे होते.

शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी

भारत कृषिप्रधान देश असूनही शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा मुद्दा संमेलनात मांडण्यात आला. शेतकऱ्यांच्या समस्या, कर्जबाजारीपणा, उत्पादन खर्च, बाजारभाव, सिंचन, पीकविमा आणि नैसर्गिक आपत्ती यांसारख्या प्रश्नांना विधिमंडळात अधिक संघटित प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी पदवीधर मतदारसंघाच्या धर्तीवर स्वतंत्र ‘शेतकरी मतदारसंघ’ निर्माण करण्याचा ठराव संमेलनात मंजूर करण्यात आला. ज्याप्रमाणे पदवीधर मतदारसंघाच्या माध्यमातून पदवीधर मतदारांना आपल्या प्रतिनिधीची निवड करण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे, त्याच धर्तीवर नोंदणीकृत शेतकरी आयडीधारकांना मतदानाचा अधिकार देऊन शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारा आमदार निवडण्याची व्यवस्था निर्माण करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. सदर ठराव आझाद समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

गावागावात ‘प्रतिसरपंच’; पहिल्या टप्प्यात 35 नियुक्त्या

ग्रामपातळीवरील नागरिकांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविणे, ग्रामविकासातील अनियमितता व भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी जनतेचा सजग प्रतिनिधी म्हणून ‘प्रतिसरपंच’ उपक्रम राबविण्यात येत असल्याचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड व जिल्हा प्रभारी विनोद मडावी यांनी सांगितले. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात 35 ग्रामपंचायतींसाठी प्रतिसरपंच नियुक्त करण्यात आले. त्यामध्ये वाकडी येथील विजय देवतळे, मार्कंडा येथील रत्ना सरपे, येडानूर येथील नितेश पोटावी, विहीरगाव येथील मुकेश सहारे, मालेवाडा येथील संतोष मोहुर्ले, बांधगाव येथील भास्कर वट्टी यांच्यासह विविध गावांतील कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयारी

आगामी ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका आझाद समाज पक्ष नियोजनबद्ध पद्धतीने आणि संघटनात्मक ताकदीने लढणार असल्याचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी स्पष्ट केले. यासाठी प्रत्येक गावात पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या. तसेच आगामी निवडणुकांमध्ये तरुण कार्यकर्त्यांना उमेदवारीमध्ये प्राधान्य देण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.

शासकीय सेवेत निवड झालेल्या सहकाऱ्यांचा सत्कार

आझाद समाज पक्षाचे सहकारी प्रितेश अंबादे, नयना बन्सोड आणि शुभम पाटील यांची नुकतीच शिक्षक म्हणून नियुक्ती झाली. तसेच पक्षाच्या माजी जिल्हाध्यक्ष सोनाशी डांगे यांची आरोग्य विभागात शासकीय सेवेत नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा शिल्ड देऊन विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला कोषाध्यक्ष नागसेन खोब्रागडे, गडचिरोली विधानसभा प्रमुख धनराज दामले, धानोरा तालुकाध्यक्ष किशोर उसेंडी, गडचिरोली तालुकाध्यक्ष प्रेम मडावी, कुरखेडा तालुकाध्यक्ष सावन चिकराम, भामरागड तालुकाध्यक्ष महेंद्र उसेंडी, महिला आघाडीच्या तारका भडके, शोभा खोब्रागडे, वनिता उसेंडी, सतीश दुर्गमवार, नितेश वेस्कडे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.