गडचिरोली : विमानतळ निर्मितीसाठी शासनाने काढलेला 12 मे 2026 रोजीचा वित्तीय व प्रशासकीय मान्यतेचा शासन आदेश रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीने गांधी जयंतीपासून (2 ऑक्टोबर) राखी-गुरवळा येथील आंबेडकर चौकात बेमुदत साखळी उपोषण सुरू केले. काही राजकीय पक्षांनीही या उपोषणाला भेट देऊन आपला पाठिंबा दर्शवला आहे.
विमानतळाच्या प्रश्नावर शेतकऱ्यांनी यापूर्वी विविध टप्प्यांवर निवेदने, आंदोलने करून शासन-प्रशासनाकडे पाठपुरावा केला. विमानतळासाठी प्रस्तावित जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा स्पष्ट विरोध असून, ही भूमिका त्यांनी वेळोवेळी शासनाच्या निदर्शनास आणून दिली. मात्र शासनाने अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट केली नसल्यामुळे शेतकरी पुन्हा आंदोलनावर उतरले आहेत.
गांधी जयंतीच्या दिवशी सुरू करण्यात आलेले हे बेमुदत साखळी उपोषण शेतकऱ्यांनी शांततेच्या आणि लोकशाही मार्गाने सुरू केले आहे. शासनाने या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्यांच्या भावना व मागण्यांचा सकारात्मक विचार करावा. 12 मे 2026 रोजीचा विमानतळ निर्मितीसंदर्भातील वित्तीय व प्रशासकीय मान्यतेचा शासन आदेश रद्द करून या निर्णयाचा विचार करावा, अशी मागणी शेतकरी संघर्ष कृती समितीचे महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केली.
शासनाने कोणताही निर्णय घेण्यापूर्वी शेतकऱ्यांची बाजू गांभीर्याने ऐकून घ्यावी. शासनाने तातडीने या प्रश्नाची दखल घेतली नाही आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर येत्या काळात हे आंदोलन आणखी तीव्र होईल, असा इशाराही ब्राम्हणवाडे यांनी यावेळी दिला.
यावेळी शिवसेनेचे (शिंदे) नेते हेमंत जंबेवार, रिपब्लिक पार्टीचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, प्राचार्य प्रकाश दुबे, प्रा.राजन बोरकर, दिवाकर निसार, वसंत राऊत, राजेश ठाकूर, विजय लाड, तात्याजी चिचघरे, परीक्षित बांबोळे, धिवरू मेश्राम, हरी मडावी, अनिल कोठारे, अरविंद बोदलकर, विकास जेंगठे, स्वप्निल बेहेरे यांच्यासह शेतकरी, शेतमजूर, युवक-युवती, महिला व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
































