Home दैनंदिन बातम्या ‘गोंडवाना विद्यापीठाच्या माध्यमातून शाश्वत आणि संतुलित विकास व्हावा’

‘गोंडवाना विद्यापीठाच्या माध्यमातून शाश्वत आणि संतुलित विकास व्हावा’

स्थापना दिन आणि पुरस्कारांचे वितरण

स्व.डॅा.शिवनाथ कुंभारे यांना मिळालेला जीवनसाधना गौरव पुरस्कार स्वीकारताना त्यांच्या पत्नी सुमन कुंभारे.
पुरस्कार स्वीकारताना ज्येष्ठ झाडीबोली साहित्यिक राजन जयस्वाल
विद्यापीठातर्फे आयोजित सत्कार स्वीकारताना प्राचार्य डॅा.राजाभाऊ मुनघाटे

गडचिरोली : अवघ्या 15 वर्षाच्या कार्यकाळात गोंडवाना विद्यापीठाने स्वतःची चांगली प्रतिमा तयार केलेली आहे. आदिवासीबहुल भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण आणि कौशल्य यांची सांगड घालून समाजाभिमुख विद्यार्थी घडविणारे विद्यापीठाचे नवोपक्रम निश्चितच दिशादर्शक आहेत. पण हे करताना विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजाचा शाश्वत आणि संतुलित विकास घडविणारे नवे मॉडेल म्हणून गोंडवाना विद्यापीठाने पुढे यावे, अशी अपेक्षा नागपूरच्या लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू आणि पर्यावरणाचे अभ्यासक डॉ.अतुल वैद्य यांनी व्यक्त केली.

गोंडवाना विद्यापीठाच्या 15 व्या वर्धापन दिन समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे होते. यावेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, प्र-कुलगुरू श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण, लक्ष्मीनारायण विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.नीरज खटी, सत्कारमूर्ती सुमन शिवनाथ कुंभारे, डॉ.राजन पन्नालाल जयस्वाल यांच्यासह विद्यापीठातील विविध विभाग प्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी समाजसेवेसाठी डॅा.शिवनाथ कुंभारे यांना मरणोपरांत आणि ज्येष्ठ झाडीबोली साहित्यिक डॅा.राजन जयस्वाल यांना जीवनसाधना गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॅा.कुंभारे यांच्यावतीने त्यांच्या पत्नी सुमन कुंभारे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

यावेळी विशेष अतिथी म्हणून बोलताना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा म्हणाले, एक जिल्हा पुढे जाण्यासाठी समाजातील सर्व घटक जबाबदार असतात. त्यामुळे कौशल्ययुक्त गुणवत्तापूर्ण शिक्षण, मजबूत अर्थव्यवस्था, आधुनिक तंत्रज्ञान आणि शाश्वत विकास यांच्या माध्यमातून विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करता येईल.

अध्यक्षस्थानावरून बोलताना कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे म्हणाले, समाजाप्रती या विद्यापीठाचे उत्तरदायित्व आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून जिल्ह्यातील समस्यांना समाधान देण्याचं काम हे विद्यापीठ करत आहे. स्पर्धा परीक्षा केंद्र, स्पार्क, स्कूल कनेक्ट अशा कितीतरी उपक्रमातून विद्यार्थी समाजाशी जोडलेले आहेत आणि जीवन शिक्षण घेत आहेत. त्यामुळे समस्यांवर समाधान देण्याचं काम हे विद्यापीठ करत आहे.

डॉ.शिवनाथ कुंभारे आणि डॉ.राजन जयस्वाल यांच्या मानपत्राचे वाचन मराठी विभागप्रमुख डॉ.सविता गोविंदवार यांनी केले. प्रास्ताविक प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे यांनी, तर आभार कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण यांनी मानले. कार्यक्रमाचे संचालन सहा.प्रा.डॅा.हेमराज निखाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला विद्यापीठात मान्यवरांच्या हस्ते स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

विविध मान्यवरांचा सत्कार

2024-25 या वर्षात राज्य शासनाचा डॉ.जे. पी.नाईक राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त शरद पवार महाविद्यालय गडचांदूरचे प्रा.डॉ.संजय गोरे, गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालय कुरखेडाचे प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे, आदर्श महाविद्यालय देसाईगंजचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे, डॉ.खत्री महाविद्यालय तुकूम चंद्रपूरचे प्राचार्य डॉ.जनार्धन काकडे यांनाही सन्मानित करण्यात आले. तसेच विशाल मेश्राम या आदिवासी तरुणाचा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये प्रवेश मिळाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.

विद्यापीठाच्या पुरस्कारांचे वितरण

या कार्यक्रमात विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील प्राध्यापक-कर्मचाऱ्यांना वर्ष 2026 च्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यात उत्कृष्ट नॅशनल अचिव्हर्स पुरस्कार डॉ.एस.बी.किशोर (सरदार पटेल महाविद्यालय,चंद्रपूर), उत्कृष्ट अधिसभा सदस्य पुरस्कार डॉ.शीला नरवाडे (चिंतामणी महाविद्यालय, पोंभुर्णा), उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार (महात्मा गांधी विज्ञान महा.गडचांदूर), उत्कृष्ट शारीरिक शिक्षण निर्देशक पुरस्कार डॉ.कुलदीप राजकिशोर गौड (सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर), उत्कृष्ट महाविद्यालयीन शिक्षक पुरस्कार डॉ.रामदास राजाराम कामडी (आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा), पद्मश्री एस.आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार डॉ.मोहन शशिकांत एथकंठीवार (यादवऱाव पोशेट्टीवार कला महाविद्यालय, तळोधी बाळापूर), उत्कृष्ट विद्यापीठ अधिकारी वर्ग–2 पुरस्कार कृष्णा देविकर (असिस्टंट प्रोग्रामर, गोंडवाना विद्यापीठ), उत्कृष्ट विद्यापीठ कर्मचारी वर्ग–3 पुरस्कार शैलेश येसेंकर (निम्न श्रेणी लिपिक), उत्कृष्ट महाविद्यालयीन कर्मचारी वर्ग–4 पुरस्कार संजय लहामू बुराडे (मोहसीनभाई जठेरी महाविद्यालय, देसाईगंज), उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार मयूर प्रमोद बुरांडे (आनंद निकेतन महाविद्यालय, वरोरा) यांचा समावेस आहे.