Home क्राईम गडचिरोली वनपरिक्षेत्रात चितळाची शिकार करणाऱ्या 9 जणांना अटक

गडचिरोली वनपरिक्षेत्रात चितळाची शिकार करणाऱ्या 9 जणांना अटक

मार्कंडा (कं) वनपरिक्षेत्रात दोघे ताब्यात

ताब्यात घेतलेल्या दोन आरोपींसह मार्कंडा (कं.) येथील वनविभागाचे पथक.

गडचिरोली / आलापल्ली : आलापल्ली वनविभागातील विविध वनक्षेत्रात अवैधपणे होणाऱ्या वन्यजीवांच्या शिकारीची एकामागून एक प्रकरणे समोर येत असताना गडचिरोली वनपरिक्षेत्रातही चितळाची शिकार करण्याचा प्रकार उघडकीस आला. त्यासाठी 9 जणांना ताब्यात घेण्यात आले. याशिवाय आलापल्ली वनविभागातील मार्कंडा (कं.) वनपरिक्षेत्राअंतर्गत उपक्षेत्र गुंडापल्लीतील सुभाषग्राम येथे वन्यप्राण्याची शिकार केल्याप्रकरणी दोन आरोपींवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली.

गडचिरोली वनपरिक्षेत्रातील कृपाळा गावाच्या परिसरात चितळाची शिकार करून मांस विक्री केल्याची माहिती वन अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार चौकशी करून 9 जणांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींवर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत कारवाई करण्यात आली. ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी बालाजी भेंडेकर यांच्या नेतृत्वाखाली वनपाल प्रदीप गेडाम, जितेंद्र सोर्डे, सुनील पेंदोरकर व पुरूषोत्तम लाडे आदींनी केली.

सुभाषग्राम शिकारप्रकरणी दोघे ताब्यात

मार्कंडा (कं.) वनपरिक्षेत्रातील कारवाईत दुर्लभ निर्मल ढाली रा.सुभाषग्राम आणि विश्वजित रवींद्र रॅाय रा.तुमडी या आरोपींना अटक करण्यात आली. वन्यप्राणी शिकार प्रकरणात त्यांचा संबंध असल्याच्या संशयावरून त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरूद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला.

उपवनसंरक्षक शैलेश मीना, सहायक वनसंरक्षक मोहम्मद आझाद यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी तनुजा एम.मोढळे अधिक तपास करत आहे. या कारवाईत गुंडापल्लीचे क्षेत्र सहायक आर.एल.बानोत, वनरक्षक एस.जी.राठोड, एन.डी.सोनवणे, सुनील खोब्रागडे, बी.के. लिपटे आदींनी सहभाग घेतला. याप्रकरणी पुढील कायदेशिर कारवाई सुरू असल्याचे आरएफओ मोढळे यांनी कळवले.

नागरिकांनी वन्यजीव संरक्षणासाठी वनविभागाला सहकार्य करावे व वन्यप्राण्यांशी संबंधित कोणतीही संशयास्पद अथवा बेकायदेशीर बाब निदर्शनास आल्यास तत्काळ वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन आरएफओ तनुजा मोढळे यांनी केले आहे.