Home दैनंदिन बातम्या आरमोरीतील अतिक्रमण, पाडकामांच्या चौकशीसाठी बेमुदत उपोषण सुरू

आरमोरीतील अतिक्रमण, पाडकामांच्या चौकशीसाठी बेमुदत उपोषण सुरू

निमगडे, प्रा.बोरकर यांचा सहभाग

आरमोरी : येथील शासकीय जमीनीवरील अतिक्रमण, जुन्या तलाठी कार्यालयाच्या पाडकामाची चौकशी, तसेच नगर परिषद क्षेत्रातील कथित अनियमिततेच्या चौकशीसह विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्त्या प्रज्ञा निमगडे यांच्या वतीने चेतन निमगडे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर यांच्यासह आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी सोमवारपासून आरमोरीच्या तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

आरमोरी येथील सर्व्हे क्रमांक 1242 या शासकीय जमिनीची मोजणी व सीमांकन करणे, कथित अतिक्रमणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर नियमानुसार कारवाई करणे, जुन्या तलाठी कार्यालयाच्या पाडकामाबाबत आवश्यक परवानग्या व अभिलेख तपासणे, तसेच नगर परिषद क्षेत्रातील बांधकामांबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांची चौकशी करणे अशा प्रमुख मागण्या या उपोषणाच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत.

संबंधित प्रशासनाने या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन पारदर्शक चौकशी करावी आणि कायद्यानुसार आवश्यक कार्यवाही करावी, अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी मांडली आहे. मागण्यांवर ठोस कार्यवाही होऊन न्याय मिळावा, अशी अपेक्षा उपोषणकर्त्यांनी व्यक्त केली आहे. उपोषणाला सामाजिक कार्यकर्त्या प्रज्ञा निमगडे, चेतन निमगडे, रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर, जिल्हा उपाध्यक्ष दशरथ साखरे, टी.एम. खोब्रागडे, अशोक शामकुळे, लवकुंश भैसारे, मारोती भैसारे, चोखोबा ढवळे, नाजुक भैसारे, नामदेव मेश्राम, भाऊराव रामटेके, जीवन मेश्राम, रोशन उके, हिवराज धंदरे आदिची उपस्थिती होती.