Home महिला विश्व गडचिरोलीत नवरात्र उत्सवातून लोकनायिकांचा वैचारिक जागर !

गडचिरोलीत नवरात्र उत्सवातून लोकनायिकांचा वैचारिक जागर !

सामाजिक जागरूकतेसाठी उपक्रम

गडचिरोली : नवरात्र म्हणजे केवळ नऊ देवींची आराधना नव्हे, तर आपल्या मातीत जन्मलेल्या, समाजाच्या परिवर्तनासाठी आयुष्य वेचलेल्या आणि आपल्या कार्यकर्तृत्वातून इतिहास घडविणाऱ्या महानायिकांच्या विचारांचा जागर करण्याचाही उत्सव आहे. या महानायिकांचे विचार, संघर्ष आणि सामाजिक योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने गडचिरोली शहरात मागील तीन वर्षांपासून वैचारिक जागर नवरात्र महोत्सव हा उपक्रम राबविला जात आहे.

समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा, अंधश्रद्धा आणि कालबाह्य विचारांना पर्याय म्हणून विवेक, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याची आवश्यकता लक्षात घेऊन या उपक्रमाला सुरूवात करण्यात आली. याच विचारातून नवरात्रीच्या नऊ दिवसांत समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नऊ महानायिकांच्या जीवनकार्याचा व विचारांचा जागर करण्याची अभिनव संकल्पना सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र सोनपिपरे यांनी मांडली. त्यांच्या या संकल्पनेतून गडचिरोली शहरात वैचारिक जागर नवरात्र महोत्सवाची सुरुवात झाली.

या उपक्रमामागील मुख्य भूमिका म्हणजे केवळ महामानव आणि महानायिकांच्या प्रतिमांचे पूजन करण्यापुरते मर्यादित न राहता त्यांचे विचार प्रत्यक्ष समाजजीवनात रुजविणे ही आहे. ज्या महानायिकांनी शिक्षण, स्त्री-मुक्ती, स्त्री पुरुष समानता, सामाजिक न्याय, समता आणि मानवी मूल्यांसाठी संघर्ष केला. त्यांचे कार्य नव्या पिढीला समजावे आणि त्यांच्या विचारांतून समाजाला नवी दिशा मिळावी, यासाठी हा महोत्सव आयोजित केला जातो.

सुरुवातीला एका छोट्याशा जागेत सुरू झालेल्या या उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत गेला. विशेष म्हणजे, धर्मानंद मेश्राम यांनी या सामाजिक व वैचारिक उपक्रमासाठी आपल्या घराच्या वरच्या मजल्यावर संविधान सभागृह बनवून सामाजिक कार्यासाठी उपलब्ध करून दिले. त्यांच्या या सहकार्यामुळे उपक्रमाला हक्काची जागा मिळाली आणि पुढे या चळवळीचा विस्तार होत गेला.

आज या महोत्सवाच्या प्रेरणेने गडचिरोली शहराची सीमा ओलांडून सहा जिल्हे आणि 13 तालुक्यांपर्यंत पोहोचून वैचारिक जागराची सुरूवात केली आहे. गडचिरोलीच्या पुन्हा तीन भागात हा उपक्रम सुरु झालाआहे. दरवर्षी विविध भागांतून नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि अभ्यासक गडचिरोली येथे येऊन या उपक्रमाची संकल्पना, आयोजन पद्धती आणि त्यामागील विचार समजून घेतात. त्यानंतर आपल्या भागातही अशाच प्रकारचे वैचारिक उपक्रम सुरू करण्याचा प्रयत्न करतात. गडचिरोलीतून सुरू झालेला एक छोटासा प्रयोग आज इतर भागांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

नवरात्रीच्या नऊ दिवसांत नऊ महानायिकांच्या कार्यकर्तृत्वाचा, त्यांच्या संघर्षाचा आणि समाजाला दिलेल्या विचारांचा जागर करण्यात येणार आहे. या माध्यमातून महिलांचे सामाजिक योगदान अधोरेखित करण्यासोबतच तरुण पिढीमध्ये चिकित्सक विचार, संविधानिक मूल्ये आणि सामाजिक परिवर्तनाची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

गडचिरोलीतील बळीराजा पॅलेस, संविधान सभागृह येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गडचिरोलीतील नागरिक, विद्यार्थी, युवक-युवती, महिला, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि परिवर्तनवादी विचारांवर विश्वास ठेवणाऱ्यांनी या महोत्सवाला उपस्थित राहून महानायिकांच्या विचारांचा जागर करावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.