अहेरी : जिल्ह्याच्या दक्षिण भागातील रुग्णांसाठी महत्वाच्या असणाऱ्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयातील रिक्त पदांवर तातडीने डॅाक्टरांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या प्रश्नावर आमदार डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांनी दोन दिवसांत रिक्त जागा भरण्यासाठी आवश्यक कार्यवाही न केल्यास रुग्णालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता. परिणामी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रवी गावंडे यांनी काही तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यासोबत प्रतिनियुक्तीवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांना परत अहेरीच्या रुग्णालयात तातडीने रुजू होण्यास सांगितले.
42 मंजूर पदांपैकी 27 भरलेली, 15 रिक्त!
दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील गरोदर माता व बालकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, या उद्देशाने कोट्यवधी रुपये खर्चून अहेरी येथे महिला व बाल रुग्णालय उभारण्यात आले. मात्र रुग्णालयातील रिक्त पदांमुळे आरोग्य सेवेबाबत प्रश्न उपस्थित होत होते. उपलब्ध माहितीनुसार, या रुग्णालयासाठी 42 नियमित पदे मंजूर आहेत. मात्र त्यापैकी 27 पदे भरलेली, तर १५ पदे रिक्त आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांसह परिचारिका, बालरोग परिचारिका, रक्तपेढी तंत्रज्ञ, औषध निर्माता आणि इतर कर्मचाऱ्यांच्या पदांचा यात समावेश आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 8 नोव्हेंबर 2025 रोजी या रुग्णालयाचे लोकार्पण झाले होते. त्यानंतर 13 फेब्रुवारी 2026 रोजी आरोग्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली होती. महिनाभरात रिक्त पदे भरण्याची ग्वाही त्यांनी दिली होती. असे असताना मनुष्यबळाचा प्रश्न कायम राहिल्याने आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
अल्टिमेटम मिळताच आरोग्य विभागाची हालचाल
रुग्णालयातील रिक्त पदे भरावीत आणि प्रतिनियुक्तीवर असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना परत बोलवावे, अशी मागणी आमदार डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांनी केली होती. दोन दिवसांत कार्यवाही न झाल्यास 13 ऑक्टोबर रोजी रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देऊन कुलूप ठोकण्याचा इशारा त्यांनी दिला होता.
या इशाऱ्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रवी गावंडे यांनी तातडीने दखल घेत काही तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. प्रतिनियुक्तीवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही परत बोलावण्यात आले. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांनी आमदार आत्राम यांची भेट घेऊन केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. आरोग्य विभागाच्या या निर्णयानंतर आमदारांनी कुलूप ठोकण्याची भूमिका तूर्त मागे घेतली. मात्र, उर्वरित तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे न भरता रुग्णालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना पुन्हा प्रतिनियुक्तीवर पाठविण्याचा प्रकार घडल्यास आरोग्य विभागाची खैर नाही, असा स्पष्ट इशारा आमदार आत्राम यांनी दिला आहे.
जिल्ह्याच्या दक्षिण भागातील आणि विशेषत: दुर्गम भागातील गरोदर माता, नवजात बालके आणि लहान मुलांना वेळेवर उपचार मिळावेत, यासाठी आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर व कर्मचाऱ्यांची उपलब्धता वाढविण्यावर भर दिला जात आहे. तज्ज्ञ व इतर डॉक्टरांच्या 16 मंजूर पदांपैकी 13 पदे भरली असून, उर्वरित तीन पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. रुग्णांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॅा.रवी गावंडे यांनी सांगितले.
































