Home दैनंदिन बातम्या दुष्काळग्रस्त गडचिरोली व चामोर्शी तालुक्यांना प्राधान्याने मोफत धान्य

दुष्काळग्रस्त गडचिरोली व चामोर्शी तालुक्यांना प्राधान्याने मोफत धान्य

अंत्योदयच्या नवीन लाभार्थ्यांनाही लाभ

गडचिरोली : दुष्काळग्रस्त गडचिरोली व चामोर्शी तालुक्यांतील पात्र कुटुंबांना नियमित मोफत अन्नधान्याचा पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे. शेतीवर अवलंबून असणारे शेतकरी, शेतमजूर आणि गरजू नागरिकांना अन्नधान्याची टंचाई भासू नये, यासाठी नवीन पात्र लाभार्थ्यांचा योजनेत समावेश करण्यासोबत, स्थलांतरितांना अन्य ठिकाणी धान्य घेण्याची सुविधा आणि वेळेवर वितरणावर भर देण्यात येत आहे.

राज्यात जून ते सप्टेंबर 2026 या कालावधीत पर्जन्यमानातील तूट व अन्य घटकांमुळे प्रभावित झालेल्या 265 तालुक्यांमध्ये खरीप 20266 हंगामासाठी ‘ट्रिगर-1’ अंतर्गत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली आणि चामोर्शी या दोन तालुक्यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने 9 ऑक्टोबर 2026 च्या शासन निर्णयानुसार जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात कार्यवाही करण्यात येत आहे.

जिल्हा पुरवठा विभागाच्या माहितीनुसार, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत जिल्हाभरात सध्या अंत्योदय अन्न योजनेतील 1 लाख 2 हजार 908 शिधापत्रिकांवर दरमहा प्रतिशिधापत्रिका 35 किलो मोफत अन्नधान्य वितरित केले जात आहे. तसेच प्राधान्य कुटुंब योजनेतील 4 लाख 73 हजार 980 लाभार्थ्यांना दरमहा प्रतिव्यक्ती 5 किलो मोफत अन्नधान्य दिले जात आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर या नियमित लाभाचे वितरण विनाविलंब व्हावे आणि एकही पात्र कुटुंब अन्नधान्यापासून वंचित राहू नये, यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत.

रोजगार अथवा पाण्याच्या शोधात स्थलांतर करणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ अंतर्गत पोर्टेबिलिटी सुविधेचा लाभ घेता येणार आहे. या सुविधेमुळे लाभार्थ्यांना ई-पॉस यंत्राद्वारे जिल्ह्यातील किंवा जिल्ह्याबाहेरील जवळच्या रास्तभाव दुकानातून त्यांच्या हक्काचे मोफत अन्नधान्य मिळवता येईल. त्यामुळे स्थलांतर झाल्यानंतरही धान्याचा लाभ घेता येणार आहे.

दुष्काळग्रस्त भागातील ज्या गरजू नागरिकांचा राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत अद्याप समावेश झालेला नाही, त्यांनी संबंधित तालुका पुरवठा शाखा किंवा तहसील कार्यालयाकडे समावेशासाठी मागणी करावी. त्यांची पात्रता तपासून, नियमानुसार योजनेतील मंजूर लाभार्थी संख्येच्या उपलब्ध मर्यादेत अंत्योदय अन्न योजना किंवा प्राधान्य कुटुंब योजनेत समावेशाची कार्यवाही करण्यात येईल. शिधापत्रिकेशी आधार क्रमांक जोडण्याची आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून संबंधित पात्र लाभार्थ्यांना धान्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.