
गडचिरोली : जिल्हा सामान्य रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन अनेक दिवसांपासून दुरुस्तीअभावी बंद असल्याने गरीब व सर्वसामान्य रुग्णांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता. गंभीर रुग्णांना सिटीस्कॅन तपासणीसाठी खासगी केंद्रांचा आधार घ्यावा लागत असल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर आर्थिक भार पडत होता. ही समस्या लक्षात घेऊन प्रशासनाने आता गडचिरोलीतील धन्वंतरी रुग्णालयात मोफत तपासणीची व्यवस्था केली आहे. (खाली वाचा)

सामाजिक कार्यकर्ते दिलीप घोडाम यांनी आमदार रामदास मसराम यांच्याकडे रुग्णांची व्यथा मांडली होती. त्यानंतर आमदार मसराम यांनी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्याकडे पाठपुरावा केला. अखेर रुग्णांच्या सोयीसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील गरीब आणि सर्वसामान्य रुग्णांना शासकीय रुग्णालयात वेळेत व माफक खर्चात उपचार मिळावेत, यासाठी शासनाकडून आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र, जिल्हा सामान्य रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन बंद असल्यामुळे रुग्णांना खासगी तपासणी केंद्रांकडे धाव घ्यावी लागत होती. वन्यप्राण्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या एका 21 वर्षीय दुचाकीस्वाराला सिटीस्कॅन तपासणीसाठी ब्रह्मपुरी येथील खासगी केंद्रात जावे लागले होते. या तपासणीसाठी जवळपास 6 हजार रुपये खर्च आल्याची बाब समोर आली होती. त्यात खासगी वाहनाच्या खर्चाचीही भर पडली होती.
दरम्यान, आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या जोगीसाखरा येथील अपघातग्रस्त राकेश वाकडे या युवकाला पुढील उपचारासाठी सिटीस्कॅनची आवश्यकता होती. मात्र गडचिरोली जिल्हा रुग्णालयातील मशीन बंद असल्याने रुग्णांसमोर अडचण निर्माण झाली. सिटीस्कॅनसारख्या महत्त्वाच्या तपासणीसाठी गरीब रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याची बाब दिलीप घोडाम यांनी आमदार रामदास मसराम यांच्या निदर्शनास आणून दिली.
या समस्येची दखल घेत आमदार रामदास मसराम यांनी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रवी गावंडे यांच्याशी संपर्क साधून सिटीस्कॅन मशीन बंद असल्यामुळे रुग्णांना होणाऱ्या त्रासाबाबत चर्चा केली.
जिल्हा रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन दुरुस्तीसाठी बंद असल्याचे डॅा.गावंडे यांनी सांगितले. मात्र रुग्णांना आर्थिक भार पडू नये म्हणून डॉ.अनंत कुंभारे यांच्या धन्वंतरी रुग्णालयाशी सामंजस्य करार करत सीटी स्कॅनचा तो खर्च आरोग्य विभागाकडून करण्याची सुविधा करण्यात आली. या सुविधेबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.
































