Home दैनंदिन बातम्या विद्यार्थिनीच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करा

विद्यार्थिनीच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करा

अभाविपचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गडचिरोली : शासकीय आश्रमशाळा सोनसरी, ता.कुरखेडा येथील विद्यार्थिनीच्या मृत्यूच्या घटनेची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली.

नवरात्री उत्सवाला जाण्याची परवानगी न मिळाल्याने ही घटना घडल्याची बाब समोर येत आहे. तथापि, मृत्यूमागील नेमकी परिस्थिती अधिकृत चौकशीतून स्पष्ट होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी संबंधित प्रशासन, शाळा व्यवस्थापन आणि वसतिगृहातील जबाबदार कर्मचाऱ्यांवर असते. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणणे आवश्यक आहे.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने प्रशासनाकडे खालील मागण्या करण्यात आल्या आहेत.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या घटनेची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यात यावी, घटनेपूर्वी संबंधित विद्यार्थिनीवर कोणत्याही प्रकारचा मानसिक ताण, दबाव किंवा धमकी होती का, याची चौकशी करण्यात यावी, वसतिगृहातील अधीक्षिका, मुख्याध्यापक, शिक्षक व संबंधित कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यपालनाची तपासणी करून निष्काळजीपणा आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्यात यावी, घटनेशी संबंधित CCTV फुटेज, नोंदवह्या व इतर महत्त्वाचे पुरावे सुरक्षित ठेवण्यात यावेत, वसतिगृहातील इतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने विशेष तपासणी करून आवश्यक सुधारणा करण्यात याव्यात. विद्यार्थ्यांना मानसिक आधार व समुपदेशन उपलब्ध करून द्यावे. तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या तक्रारी गोपनीय पद्धतीने मांडता याव्यात, यासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्यात यावी. चौकशीची सद्यस्थिती, निष्कर्ष आणि करण्यात आलेल्या कार्यवाहीबाबत नियमानुसार लेखी माहिती देण्यात यावी, अशी मागणी अभाविपने केली आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होता कामा नये. निवासी शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षित व भयमुक्त वातावरण मिळणे ही प्रशासनाची महत्त्वाची जबाबदारी आहे. भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडू नयेत, यासाठी प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी गडचिरोलीचे नगरमंत्री संकेत म्हस्के, विकास बोदलकर, सौरव ढवळे उपस्थित होते.