गडचिरोली : जिल्ह्यातील रेती उत्खननासाठी योग्य स्थळांचा समावेश असलेला सन 2026-27 चा प्रारूप जिल्हा सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात आला आहे. तालुकास्तरीय संनियंत्रण समितीच्या शिफारसीनुसार जिल्ह्यातील एकूण 96 रेतीघाट यावर्षी लिलावासाठी योग्य असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. नागरिकांच्या अवलोकनासाठी तो www.gadchiroli.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे. या प्रारूप अहवालावर नागरिकांना आपले म्हणणे मांडता येणार आहे.

या अहवालाबाबत जाहीर सूचनेच्या दिनांकापासून 21 दिवसांच्या आत लेखी अभिप्राय, सूचना व आक्षेप सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. अभिप्राय व आक्षेप जिल्हाधिकारी कार्यालयातील खनिकर्म शाखेच्या जिल्हा वाळू सनियंत्रण समितीकडे किंवा उपविभागीय अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथील जिल्हा सर्वेक्षण अहवाल उपविभागीय समितीकडे सादर करावेत. तसेच mininggad@gmail.com या ईमेलवरही पाठविता येतील, असे जिल्हा खनिकर्म अधिकारी इम्रान शेख यांनी कळविले आहे.
































