Home पब्लिक प्रॉब्लेम ठाकूरनगर, नरेंद्रपूर परिसरातील समस्यांसाठी अधिकाऱ्यांसोबत बैठक

ठाकूरनगर, नरेंद्रपूर परिसरातील समस्यांसाठी अधिकाऱ्यांसोबत बैठक

मानवाधिकार संघटनेचा पुढाकार

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील घोट परिसरातल्या ठाकुरनगर, नरेंद्रपूर येथील नागरिकांच्या विविध समस्यांवर तोडगा काढून विकासात्मक कामांना चालना देण्यासाठी मानवाधिकार संघटनेच्या पुढाकाराने अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक घेण्यात आली. यावेळी वनविभाग, महावितरणच्या अधिकाऱ्यांसह मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॅा.प्रणय खुणे आणि गावातील नागरिक उपस्थित होते.

नरेंद्रपूर येथील राधा-गोविंद मंदिराच्या प्रांगणात झालेल्या या बैठकीत प्रणय खुणे यांच्यासह गावातील नागरिकांनी विविध समस्या उपस्थित केल्या. अनेक वर्षांपासून विकासाच्या बाबतीत हा परिसर दुर्लक्षित असून त्या कामांना आता चालना द्यावी, असे आवाहन केले. वनविभागाचे राऊंड ऑफिसर राठोड, महावितरणचे आष्टी विभागाचे कनिष्ठ अभियंता राऊत आणि वनविकास महामंडळाचे येलेकर व आगाशे यांनी समस्या जाणून घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले.

वनाधिकारी राठोड यांनी संयुक्त वन व्यवस्थापन समिती स्थापन करण्याबाबत तथा विविध विकासात्मक कामांबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष नाना उपाध्ये, महेश विस्वास, भामरागड तालुकाध्यक्ष भीमराव वनकर, दिनेश मुजुमदार, तपन माझी, स्थानिक गावकरी, जेष्ठ नेते विकास मैत्र, महिला आघाडीच्या रेबा सरदार, आनंदग्राम येथील विमल रॉय, वसंतपूर येथील राम विश्वास, शुभम दास व नरेंद्रपूर, ठाकूरनगर येथील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.