Home दैनंदिन बातम्या विशेष लोकअदालतीत धनादेश अनादराची 8 प्रकरणे निकाली

विशेष लोकअदालतीत धनादेश अनादराची 8 प्रकरणे निकाली

8.65 लाख रुपयांची वसुली

A vector illustration of People in Court Scene Illustration

गडचिरोली : धनादेश अनादराशी संबंधित प्रलंबित प्रकरणांचा तडजोडीने निपटारा करण्यासाठी गडचिरोली जिल्हा न्यायालयासह जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये आयोजित विशेष लोक अदालतीत 8 प्रकरणे निकाली काढण्यात आली. या माध्यमातून एकूण 8 लाख 65 हजार 643 रुपयांची वसुली झाली. या विशेष लोक अदालतीसमोर तडजोडीसाठी एकूण 232 प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली, उच्च न्यायालय मुंबई आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. धनादेश अनादराशी संबंधित प्रकरणांचा तडजोडीने निपटारा करण्यासाठी जिल्हाभरात एकूण सात पॅनल नियुक्त करण्यात आले होते.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष अनिरुद्ध टिकले आणि प्रभारी सचिव ए.ए. भटेवरा यांच्या देखरेखीखाली या विशेष लोक अदालतीचे कामकाज पार पडले.

जिल्हा न्यायालय, गडचिरोली येथील पॅनलचे प्रमुख म्हणून सहदिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) तथा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस.बी. विजयकर यांनी काम पाहिले. तर विधी स्वयंसेविका सुरेखा बारसागडे यांनी पॅनल सदस्य म्हणून जबाबदारी पार पाडली.

या विशेष लोक अदालतीच्या आयोजनासाठी गडचिरोली जिल्हा अधिवक्ता संघाचे अध्यक्ष अॅड.संजय देशमुख, ज्येष्ठ अधिवक्ता, इतर अधिवक्ता, न्यायालयीन कर्मचारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक अ.ल. आमटे यांनी दिली.