गडचिरोली : भरधाव इनोव्हाने दुचाकीला मागून धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे मित्र गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी रात्री मूल मार्गावरील पुलखल फाट्याजवळच्या सारडा राईस मिलसमोर झाला. धडक देणारी इनोव्हा गडचिरोलीमधील असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मृतांमध्ये सुरेश डोकाजी भांडेकर (60 वर्ष) आणि दिवाकर बाबाराव म्हशाखेत्री (55 वर्ष), दोघेही रा.वाघोली बुट्टी, (ता.सावली, जि.चंद्रपूर) यांचा समावेश आहे. ते आपल्या दुचाकीने (एमएच 34, सीएच 7911) पुलखल येथील नातेवाईकांकडे दंडारनिमित्त आयोजित जेवणासाठी जात होते. मुख्य मार्गावरून पुलखलकडे वळत असतानाच भरधाव वेगात आलेल्या इनोव्हाने (क्र.एमच 49, बी 25340) त्यांना मागून जोरदार धडक दिली. अतिवेगामुळे कार अनियंत्रित झाली आणि रस्त्यालगत उलटली.
दुचाकीवरील दोघांनीही हेल्मेट घातलेले नव्हते. ते लगतच्या गिट्टीच्या ढिगाऱ्यावर कोसळले. त्यामुळे डोक्याला आणि हाताला गंभीर मार लागला. घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोन्ही जखमींना रुग्णालयात हलविले. मात्र काही वेळातच दोघांचाही मृत्यू झाला.
इनोव्हा चालक आर्चिश गोविंद बडवाईक (रा.तुमसर, जि.भंडारा) याच्याविरूद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 281, 106(1) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम 134, 184 व 187 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस करीत आहेत.
































