Home दैनंदिन बातम्या आ.डॉ.नरोटे यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य वर्धिनी समितीची बैठक

आ.डॉ.नरोटे यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य वर्धिनी समितीची बैठक

तीन तालुक्यांचा घेतला आढावा

धानोरा : गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील गडचिरोली, चामोर्शी व धानोरा या तीन तालुक्यांसाठी एकात्मिक आरोग्य वर्धिनी समितीची बैठक धानोरा येथे आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत तिन्ही तालुक्यांतील राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

यावेळी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून 24 तास नागरिकांना तत्परतेने व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी, अशा स्पष्ट सूचना आमदार डॉ.नरोटे यांनी दिल्या.

कर्करोगग्रस्त रुग्णांना जिल्हा रुग्णालय, गडचिरोली येथे आवश्यक असलेली सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी संबंधित आरोग्य यंत्रणेला सूचना दिल्या. तसेच दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना शुद्ध व सुरक्षित पाणीपुरवठा होईल, याची दक्षता घेण्याच्या सूचना गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या.

कुपोषण निर्मूलनासाठी सॅम-मॅम श्रेणीतील बालकांना अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी दत्तक घेऊन त्यांच्या आरोग्य व पोषण स्थितीत सुधारणा करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, तसेच ही बालके कुपोषणमुक्त होतील यासाठी प्रभावी कार्यवाही करावी, अशा सूचना बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

या बैठकीदरम्यान गडचिरोलीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अमित साळवे, धानोराचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष जोगदंड व चामोर्शीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र पेड्याला यांनी आपापल्या तालुक्यातील राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या प्रगतीचा आढावा सादर केला.

या बैठकीस तिन्ही तालुक्यांचे गटविकास अधिकारी, विविध विभागांचे तालुकास्तरीय खातेप्रमुख, वैद्यकीय अधीक्षक तसेच वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

जनतेला गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळावी आणि कुपोषणमुक्त, निरोगी गडचिरोली निर्माण व्हावे, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.