गडचिरोली : मार्कंडा देवस्थानाच्या जिर्णोद्धारासाठी निधी आहे, नियोजन आहे. पण पुरातत्व विभागाच्या कारभारामुळे हे काम रखडले असल्याचे सांगत या कामाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. ना.फडणवीस यांनी मार्कंडा मंदिराला भेट देऊन पुजा करत मंदिराची संपूर्ण माहिती जाणून घेतली. त्यानंतर जिर्णोद्धार कामाचा आढावा अधिकारी आणि गावकऱ्यांच्या उपस्थितीत घेतला.
यावेळी खासदार अशोक नेते, आ.डॅा.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे, पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मीना, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, पुरातत्व विभागाचे नागपूर येथील अधीक्षक अरुण मलिक, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता निता ठाकरे, कार्यकारी अभियंता साखरवाडे, मार्कंडा देवस्थानचे अध्यक्ष गजानन भांडेकर, सचिव मृत्यूंजय गायकवाड यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी हेमाडपंथी शिल्पकृतीचे अभ्यासक असलेले पोलिस उपनिरीक्षक यांनी प्रवीण योगी यांनी मार्कंडा मंदिरावरील शिल्पकृतींचे अर्थ आणि त्यांचे वैशिष्ट्य याबद्दलची माहिती उपमुख्यमंत्र्यांना दिली.
मार्कंडा देवस्थानच्या विकासाकरिता एमएमआरडीसीच्या माध्यमातून मंजूर 100 कोटी रुपये व पुरातत्त्व विभागाच्या पाच कोटी रुपयांच्या प्रलंबित विकास कामांचा आढावा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला. महाशिवरात्रीला परंपरेनुसार मंदिर परिसरात प्रसाद वितरणाला आडकाठी न आणण्याची सूचना फडणवीस यांनी दिली.