बलात्काराच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अखेर 14 वर्षानंतर ठोकल्या बेड्या

पोलिसांना चकमा देऊन झाला होता गायब

मुलचेरा : एका बलात्काराच्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर पोलिसांना चकमा देऊन न्यायालयाच्या आवारातून पळून गेलेला आरोपी तब्बल 14 वर्षांपासून पोलिसांच्या हाती लागत नव्हता. अखेर मुलचेरा पोलिसांनी त्याचा शोध लावला आणि त्याला अटक केली. अनादी अमुल्य सरकार (40 वर्ष) असे त्याचे नाव असून तो तालुक्यातील देशबंधूग्राम येथील रहिवासी आहे.

सन 2012 मध्ये भादंवि कलम 376, 506, तसेच कलम 224 अन्वये त्याच्यावर मुलचेरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करुन त्याला अटक करण्यात आली होती. अटकेनंतर त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यानंतर त्याला न्यायालयाबाहेर आणुन बेडया लावत असताना हा आरोपी पोलिसांच्या हातून निसटला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केल्यानंतरही तो सापडला नाही.

तब्बल 14 वर्षापासून तो पोलिसांना सापडलेला नव्हता. दरम्यान दि.3 नोव्हेंबर रोजी सदर आरोपी देशबंधुग्राम येथील आपल्या घरी आला आहे, अशी गुप्त माहिती मिळाल्यानंतर मुलचेरा ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोनि महेश विधाते यांच्या नेतृत्वात पो.उपनिरीक्षक संदीप साखरे, हवालदार चरणदास कुकडकार, हवालदार विष्णू चव्हान, अंमलदार संतोष दहेलकर, बाळू केकान, सचिन मंथनवार, जयश्री आव्हाड, शोभा गोदारी यांनी दि.4 नोव्हेंबर रोजी आरोपीच्या घरातून त्याला अटक केली. त्याला चामोर्शीच्या न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयीन कोठडी मिळाली.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) श्रेणिक लोढा तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी (अहेरी) अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.