Home पब्लिक प्रॉब्लेम वनविभागात नोकरीचे आमिष देऊन होत आहे बेरोजगारांची फसवणूक

वनविभागात नोकरीचे आमिष देऊन होत आहे बेरोजगारांची फसवणूक

सावध राहा; मुख्य वनसंरक्षकांचे आवाहन

गडचिरोली : राज्याच्या काही भागांत वनविभागात वनरक्षक, वनपाल व वनपरिक्षेत्र अधिकारी पदांवर नियुक्ती करून देण्याचे खोटे आमिष दाखवून काही व्यक्ती उमेदवारांची आर्थिक फसवणूक करत असल्याचे प्रकार सुरू आहेत. उमेदवारांना बनावट नियुक्ती आदेश देऊन पैशांची मागणी केली जात आहे. मात्र बेरोजगार युवकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता अशा प्रकारांबाबत सावधगिरी बाळगावी, असे आवाहन गडचिरोली वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक गजेंद्र नरवणे यांनी केले आहे.

उमेदवारांची दिशाभूल करण्यासाठी वनविभागाच्या कार्यालयाचे बनावट लेटरहेड वापरले जात असून महाराष्ट्र शासनाच्या लोगोचाही गैरवापर केला जात आहे. त्यामुळे शासकीय स्वरूपात दिसणारा नियुक्ती आदेश मिळाला तरी त्याची अधिकृत माध्यमांतून खातरजमा करावी. कोणत्याही व्यक्तीच्या आश्वासनावर विश्वास ठेवून पैसे देऊ नये, असे नरवणे यांनी स्पष्ट केले.

वनरक्षक, वनपाल व वनपरिक्षेत्र अधिकारी पदांची भरती आणि नियुक्ती शासनाच्या विहित नियमांनुसार केली जाते. पैसे किंवा वैयक्तिक संपर्काच्या आधारे या पदांवर नियुक्ती मिळवून देण्याचे आश्वासन देणाऱ्या व्यक्तींशी उमेदवारांनी आर्थिक व्यवहार करू नयेत, असे मुख्य वनसंरक्षकांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

नियुक्तीच्या मोबदल्यात पैशांची मागणी झाल्यास, बनावट नियुक्ती आदेश मिळाल्यास किंवा वनविभागाच्या नावाने संशयास्पद कागदपत्रे सादर करण्यात आल्यास संबंधितांनी तात्काळ मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), पोटेगाव रोड, गडचिरोली यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. भरतीसंदर्भातील माहिती शासन व वनविभागाच्या अधिकृत माध्यमांवरूनच तपासावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.