आरक्षणाच्या मुद्द्यावरून डॅा.चिमुरकर यांनी सुरू केलेले उपोषण बेदखल

प्रशासन, सरकारकडून प्रतिसाद नाही

आरमोरी : धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणात समावेश करण्याच्या हालचालींना विरोध करण्यासह इतर मागण्यांसाठी डॉ.शिलू चिमूरकर यांनी आरमोरीच्या तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मात्र चार दिवस होऊनही सरकारकडून किंवा प्रशासकीय यंत्रणेकडून त्यांच्या उपोषणाची दखल घेण्यात आलेली नाही. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत असल्यामुळे आदिवासी समाजात रोष निर्माण होत आहे.

शिंदे समितीचा अहवाल सुपूर्द झाल्यापासून आदिवासींच्या आरक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विशेषतः काही धनगड जातींचे दाखले रद्द केल्याने आदिवासी समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी वाढत आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता सरकार आदिवासी समाजाच्या अधिकारांवर आघात करत असल्याचा आरोप करत डॉ.शिलू चिमूरकर यांनी दि.8 पासून उपोषण सुरू केले. धनगर समाजाचा एसटी आरक्षणात समावेश होऊ नये आणि आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व आरोग्य सुविधांचा विस्तार करावा, हे मुद्दे अग्रक्रमावर ठेवून त्यांनी हे उपोषण सुरू केले आहे.