अबब, अवघ्या काही महिन्यात उखडले गट्टू अन् नालीचे बांधकाम

एलआयसी चौकातील कामावर प्रश्नचिन्ह

गडचिरोली : शहरातील एलआयसी चौकातील दुकान लाईनच्या भागात तीन ते चार महिन्याअगोदर पार्किंग शेड, गट्टू लावणे आणि नालीचे बांधकाम करण्यात आले. पण या कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट असल्याने अवघ्या काही दिवसात हे काम आपला रंग दाखवू लागले आहे. यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी आझाद समाज पक्षाचे राज बन्सोड यांनी केली आहे.

या भागात नाली आणि त्यावर बसविलेल्या लोखंडी जाळी तकलादू असल्यामुळे त्या तुटत आहे. त्यावरून जाणाऱ्या दुचाकी, चार चाकी वाहने त्यात फसतात. पायी चालणाऱ्यांना दुखापत होण्याची व जीविताला देखील धोका होण्याची शक्यता आहे. गट्टूचे काम अर्धवत आहे. त्याला लागून उभारलेल्या ओट्या संरक्षक भिंतीचे पोपडे हाताने उखडले जातात एवढे ते निकृष्ट आहेत.

या कामांची चौकशी करून या तकलादू कामामुळे होणारा संभावित धोका टाळण्यासंबंधी या कामाची पुर्नबांधणी करावी आणि संबंधितांवर योग्य कारवाई करावी, अशी मागणी बन्सोड यांनी केली आहे.