गडचिरोली : छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धेच नव्हे, तर रयतेचे खरे राजे होते. त्यांच्या काळात प्रजेला एखादा काटाही रुतला, तरी त्याची वेदना महाराजांपर्यंत पोहोचत होती. त्यांचा राज्यकारभार म्हणजे न्याय, सुरक्षितता आणि प्रशासनाचा उत्कृष्ट नमुना होता, असे गौरवोद्गार माजी खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांनी काढले.
डोंगरगाव (येवली) येथे मंगळवारी सार्वजनिक जय शिवराय ग्रुपच्या वतीने भव्य शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचे उद्घाटन अशोक नेते यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून झाले. याप्रसंगी ते बोलत होते. या सोहळ्यात सहभागी होण्याचा योग हा आनंददायी असल्याचे नेते म्हणाले.
यावेळी शिवाजी महाराजांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. या सोहळ्याला भाजपचे तालुकाध्यक्ष विलास पा.भांडेकर, ग्रामपंचायत सदस्य नेपाल माधमवार, पोलीस पंकज राऊत, प्रा.कुत्तरमारे, प्रा.दडगेलवार, गुरुदेव भक्त जीवन देशमुख, मुकुंद बावणे, आशा वर्कर हिरा ठाकरे, शिवसेनेचे वसंत गावतुरे, ग्रा.पं. सदस्य देवलता कोसनकर, राहुल गेडाम, पवन कोसनकर आदींसह डोंगरगाव येथील नागरिक आणि बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवजन्मोत्सवाचा उत्साह आणि जल्लोष
संपूर्ण कार्यक्रमात शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित भाषणे, पोवाडे, सांस्कृतिक कार्यक्रम आणि शिवगर्जना यामुळे शिवप्रेमींमध्ये अभूतपूर्व उत्साह संचारला होता. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी शिवजन्मोत्सव सोहळ्याचा आनंद घेतला.