गडचिरोली : जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर गडचिरोली ते केदारनाथ असा तब्बल 1,843 किलोमीटरचा प्रवास एकट्याने सायकलवरून पूर्ण करणारे युवा सायकलपटू निलेश विलास गुरुनुले यांचा सायकल स्नेही मंडळ, गडचिरोलीच्या वतीने नवीन सायकल भेट देऊन सन्मान करण्यात आला. गरीब परिस्थितीवर मात करून वृत्तपत्र वितरणाचे काम करत आपल्या ध्येयाचा पाठलाग करणाऱ्या निलेशच्या या कामगिरीचे उपस्थितांनी कौतुक केले.
‘सायकल चालवा, आरोग्यवान व्हा, प्रदूषण टाळा’ हा संदेश घेऊन गेल्या नऊ वर्षांपासून कार्यरत असलेल्या सायकल स्नेही मंडळाच्या वतीने वसंत विद्यालयात हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सायकल स्नेही मंडळाचे संस्थापक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते. तसेच ज्येष्ठ पत्रकार अनिल धामोडे, मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रा.विलास पारखी, जिल्हा सरचिटणीस उदय धकाते, वसंत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुचिता कामडी, मीरा बिसेन यांच्यासह सायकल स्नेही मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आणि वृत्तपत्र वितरक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संघर्षातून उभ्या राहणाऱ्या तरुणांना साथ देण्याचा निर्धार
ज्येष्ठ पत्रकार अनिल धामोडे यांनी जिल्ह्यातील वृत्तपत्र वितरणाचे काम करत संघर्षातून पुढे आलेल्या चार सायकल स्नेही युवकांच्या प्रेरणादायी वाटचालीचा उल्लेख केला. शुभम गावतुरे याने वृत्तपत्र वितरण करत इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले, रुपेश भांडारे वृत्तपत्र क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहे, तर वृत्तपत्र वाटप करत आर्ट शाखेतून जिल्ह्यात अव्वल आलेल्या साहिल लोणबले याची पुण्यातील उच्च शिक्षणानंतर पॅरिस विद्यापीठातील मास्टर्स इन पब्लिक पॉलिसी अभ्यासक्रमासाठी निवड झाल्याचे त्यांनी सांगितले. निलेशच्या जिद्दीला सलाम करत त्याच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी घेण्याबरोबरच रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठीही प्रयत्न करू, असा निर्धार यावेळी अनिल धामोडे यांनी व्यक्त केला.
‘अनेक अडचणी आल्या, पण केदारनाथ गाठले’
यावेळी निलेश गुरुनुले याने आपल्या 1,843 किलोमीटरच्या सायकल प्रवासातील थक्क करणारे अनुभव सांगितले. प्रवासात अनेक अडचणी आणि आव्हाने आली; मात्र जिद्द कायम ठेवत अखेर केदारनाथ गाठून दर्शन घेतल्याचा आनंद अविस्मरणीय असल्याचे त्याने सांगितले.
‘सायकल म्हणजे आरोग्यासाठी संजीवनी’
अध्यक्षीय भाषणात बंडोपंत बोढेकर म्हणाले, “सायकल ही माणसाची खरा मित्र आहे. ती आपल्या आरोग्यासाठी संजीवनीसारखी आहे. सायकल स्नेही होणे हे आजच्या काळातील शहाणपणाचे लक्षण आहे. आरोग्य, पर्यावरण आणि प्रदूषणाचा विचार करता आज प्रत्येकाने सायकलस्नेही होणे गरजेचे आहे.” निलेशसारख्या तरुणांच्या जिद्दीला प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या संघर्षाला समाजाने साथ देणे हीच या सन्मानामागची खरी भावना असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुरलीधर दोनाडकर, प्रा.अरुण पालारपवार, डॉ.चंद्रकांत लेनगुरे, प्रा.उल्हास आखाडे, उपेंद्र द्रोहणकर, डॉ.योगेश पाटील, प्रा.संतोष संगनवार, प्रा.ज्ञानेश्वर धकाते, माधुरी बागडे-बोरकर, भाऊसाहेब साळवे (बल्लारपूर), वैभव बारेकर, डॉ.शुभम मोंढे, प्रा.सुनिता विजय साळवे, भाविक ठक्कर, संजय आकरे, राजेंद्र गव्हारे आदींनी सहकार्य केले. प्रास्ताविक प्रा.विलास पारखी यांनी केले. रसंचालन मीरा बिसेन यांनी, तर आभार उदय धकाते यांनी मानले.
































