Home पब्लिक प्रॉब्लेम रबी धानाच्या खरेदीचे वांदे, अद्याप केंद्रच सुरू केले नाही

रबी धानाच्या खरेदीचे वांदे, अद्याप केंद्रच सुरू केले नाही

दक्षिण भागात शेतकऱ्यांचा संताप

शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गावर धानाचे पोते जाळून संताप व्यक्त केला
तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी जमलेले शेतकरी

गडचिरोली : रबी हंगामात धानाचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचा धान महिनाभरापासून तयार झालेला असताना शासनाचे हमीभाव खरेदी केंद्रच सुरू झाले नसल्याने शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. जिल्ह्याच्या दक्षिण भागातील शेतकऱ्यांनी याकडे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावर धानाचे पोते जाळून आपला संताप व्यक्त केला आहे.आल्लापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावर रस्ता अडवून हे आंदोलन करण्यात आले.

मुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांचे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांनी 6 तारखेपर्यंत सर्व धान खरेदी केंद्र सुरू न केल्यास 8 तारखेपासून सिरोंचा तहसील कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्याचा इशारा तहसिलदारांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. काही दिवसातच पावसाला सुरूवात होईल. त्यामुळे आपले धानपीक ठेवायचे तरी कुठे? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.

काँग्रेस जिल्हाध्यक्ष कोवासे यांचा पुढाकार

जिल्ह्यात तुटपूंज्या सिंचन सुविधांच्या भरवशावर अनेक शेतकरी रब्बी हंगामात मका व धान पिकाचे उत्पादन घेत आहेत. दरवर्षी कमी-अधिक प्रमाणात रब्बी हंगामातील शेतमालाची खरेदी करण्यासाठी शासनस्तरावरून खरेदी केंद्रे सुरू केली जात होती. मात्र यावर्षी पावसाळा तोंडावर येऊनही पुरेशा प्रमाणात शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा प्रशासनाने तत्काळ शासकीय खरेदी केंद्र सुरू करावेत, यासोबतच गोडावूनही उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.विश्वजीत कोवासे यांनी केली आहे.

अनेक शेतकरी मका व भात पिकाची विक्री करण्यासाठी शासकीय खरेदी केंद्रांवर चकरा मारत आहेत. तरीही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने उन्हाळी पिकांची खरेदी करण्यासाठी त्वरीत शासकीय खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. प्रशासनाने दखल घेतली नाही तर प्रसंगी शेतकऱ्यांना सोबत घेऊन जिल्हा काँग्रेस कमिटी रस्त्यावर उतरेल, असा इशाराही कोवासे यांनी दिला आहे.