कुरखेडा : तालुक्यातील पुराडा ग्रामपंचायतमधील व्यवहारासंदर्भात प्राप्त तक्रारींची गटविकास अधिकाऱ्यांनी गांभिर्याने दखल घेतली आहे. यासंदर्भात चौकशीसाठी अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतला भेटी दिल्या असताना पुराडाचे ग्रामपंचायत अधिकारी निलेश जवंजाळकर यांनी कोणताही अधिकृत रेकॅार्ड, दस्तावेज तपासणीसाठी सादर केला नाही. तसेच चौकशीतही सहकार्य केले नसल्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा गटविकास अधिकाऱ्यांनी दिला आहे.
ग्रामपंचायत अधिकारी जवंजाळकर यांना 27 मे रोजी आवश्यक दस्तावेजांसह उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते. परंतू आता 4 जून 2026 रोजी विस्तार अधिकारी (पंचायत) यांना पुराडा ग्रामपंचायतला पाठवून शासकीय दस्तावेत ताब्यात घेण्यासाठी पंचनामा केला जाणार आहे. यावेळी सर्व शासकीय दस्तावेज आणि रेकॅार्डसह ग्रामपंचायतमध्ये उपस्थित राहावे, असे निर्देश बिडीओंनी दिले आहे.
यावेळी अनुपस्थित राहिल्यास किंवा शासकीय रेकॅार्ड हस्तगत करण्यास अडथळा निर्माण केल्यास पंच कपाटे उघडून दस्तावेज ताब्यात घेतील. तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी व दस्तावेत दडपल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा गंभीर इशारा बिडीओंनी दिला आहे.
































