Home पब्लिक प्रॉब्लेम गोसेखुर्दचे पाणी वैनगंगेत येणार, सभापतींच्या पाठपुराव्याला यश

गोसेखुर्दचे पाणी वैनगंगेत येणार, सभापतींच्या पाठपुराव्याला यश

गडचिरोलीची पाणी समस्या मिटणार

गडचिरोली : यावर्षी वाढलेल्या तीव्र तापमानामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण वाढून वैनगंगा नदीची पाणी पातळी झपाट्याने कमी झाली. परिणामी गडचिरोलीकरांना उन्हाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. यावर तोडगा काढण्यात अखेर गडचिरोली नगर परिषदेला यश आले. पाणी पुरवठा सभापती लिलाधर भरडकर यांनी सातत्याने पाठपुरावा करत या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केल्याने त्याला यश आले असून, येत्या 3 दिवसात पाणी पुरवठ्याची समस्या दूर होणार आहे.

शहरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर वैनगंगेचे पाणी अडविण्यासाठी तात्पुरता बंधारा उभारण्यास सुरूवात केली. याशिवाय सभापती भरडकर यांनी गेल्या पाच दिवसांपासून प्रशासनाशी संपर्क करून गोसेखुर्द प्रकल्पातून वैनगंगा नदीला पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी लावून धरली. या मागणीला अखेर यश आले असून 3 जूनपासून पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे 5 जूनपासून गडचिरोली शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

यासंदर्भात सभापती भरडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहराच्या पाणी समस्येवर सहपालकमंत्री ॲड.आशिष जैस्वाल, जिल्हाधिकारी, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याशी चर्चा करून 29 मे रोजी प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी भंडारा व गोसेखुर्द प्रकल्पाच्या अधीक्षक अभियंत्यांकडे वैनगंगा नदी पात्रात पाणी सोडण्याची विनंती करण्यात आली. गोसेखुर्द प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांनी 29 मे रोजी यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकारी भंडारा यांच्याकडे सादर केला.

दरम्यान, 1 जून रोजी जिल्हाधिकारी भंडारा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वैनगंगा नदी पात्रात पाणी सोडण्यास मंजुरी देण्यात आली. यासाठी सभापतींनी भंडाराचे पालकमंत्री पंकज भोयर, जिल्हाधिकारी भंडारा, अतिरिक्त जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंता तसेच कार्यकारी अभियंता गोसेखुर्द प्रकल्प यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून गडचिरोली शहरातील पाणीटंचाईची गंभीर समस्या मांडली होती. सध्या हा प्रस्ताव जलसंपदा विभागाच्या नागपूर येथील सचिवांकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आला असून, 3 जूनपासून गोसेखुर्द धरणातून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.

गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी वैनगंगा नदीला सोडल्यानंतर ते अडविण्यासाठी नगर परिषदेकडून वैनगंगा नदीपात्रात माती व रेती टाकून तात्पुरत्या बंधाऱ्याचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. 3 जूनपर्यंत हे काम पूर्ण होणार असून त्यानंतर शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

सध्याच्या परिस्थितीत नागरिकांना दिलासा देण्यासाठी नगर परिषदेकडून दोन पाणी टँकर, तसेच एक खासगी टँकर उपलब्ध करून देण्यात आला आहे. या माध्यमातून शहरातील विविध भागांमध्ये पाणीपुरवठा सुरू असून नागरिकांना अल्प प्रमाणात का होईना, पाणी उपलब्ध करून दिले जात असल्याची माहिती पाणी पुरवठा सभापती लिलाधर भरडकर यांनी दिली.