गडचिरोली : दोन आठवड्यांपूर्वी गडचिरोली शहराजवळील मुरखळाजवळ झालेल्या एसटी बसच्या अपघातातील गंभीर जखमी रुपाली नीळकंठ खणके (30 वर्ष) यांचा नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे या अपघातातील एकूण मृतांची संख्या 4 झाली आहे. या अपघातातील काही जखमींवर नागपूरमध्ये वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू असून काहींची प्रकृती अजूनही गंभीर असल्याचे सांगण्यात येते.
गडचिरोलीवरून सकाळी 6.30 वाजता उमरखेडकडे जाण्यासाठी निघालेली एसटी महामंडळाची बस मुरखळा गावाजवळ रस्त्यालगतच्या कठड्यावर धडकून रस्त्याखालील खोलगट भागात कोसळून हा अपघात झाला होता. बसने दोन पलट्या खाल्ल्याने आतील प्रवाशांना चांगलाच मार लागला. या अपघातात एका वृद्धासह एक महिला आणि 7 महिन्याचे बाळ दगावले होते. दरम्यान काही गंभीर जखमींना त्यांच्या नातेवाईकांनी पुढील उपचारासाठी नागपूरला हलविले. त्यातील रुपाली खणके यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर नागपूरच्या न्युरॉन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
या अपघातानंतर एसटी महामंडळ, परिवहन विभाग आणि पोलीस प्रशासनाकडून अपघाताच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. वाहनावरील नियंत्रण सुटण्यामागील कारण, तसेच इतर तांत्रिक बाबींची चौकशी करण्यात येत आहे. प्राथमिक तपासात या अपघातासाठी बस चालकाला जबाबदार धरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
































