आश्रमशाळा शिक्षकांच्या संघटनेने व्यक्त केली अपर आयुक्तांपुढे व्यथा

समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद

गडचिरोली : आदिवासी विकास विभाग नागपूरचे अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे यांची सीटू संलग्नित आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन आपल्या विविध समस्यांबाबत चर्चा केली. त्या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही अपर आयुक्त ठाकरे यांनी दिली.

संघटनेचे राज्य सरचिटणीस प्रा.बी.टी.भामरे यांच्या नेतृत्वात पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी आश्रमशाळेत उद्भवलेल्या अनेक समस्यांबाबत निवेदन सादर केले. यावेळी झालेल्या सभेत त्यांनी आश्रमशाळेतील समस्या कर्मचाऱ्यांकडून जाणून घेतल्या. त्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन देत अपर आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

मला माझ्या कर्तव्याची जाणीव आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसह सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनी कार्यतत्पर राहून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. शिष्टमंडळात गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळा शिक्षकांसह नागपूर विभागातील 100 वर शिक्षक उपस्थित होते.

या भेटीच्या वेळी व्यासपीठावर अपर आयुक्त रवींद्र ठाकरे यांच्यासोबत संघटनेचे राज्य सरचिटणीस प्रा.बी.टी.भामरे, उपआयुक्त दिगांबर चव्हाण, संघटनेचे नागपूर विभागीय अध्यक्ष रामदास खवशी उपस्थित होते.

अशा आहेत मागण्या

यावेळी सादर केलेले निवेदनातील मागण्यांमध्ये, आश्रमशाळा भेटीच्या वेळेस अधिकाऱ्यांकडून शिक्षक व कर्मचाऱ्यांना सन्मानाची वागणूक मिळावी, आश्रमशाळेत सुरू असलेल्या अनेक उपक्रमांचे व्यवस्थित नियोजन करणे, वर्धा व चिमूर प्रकल्पातील शिक्षक तसेच तपासणी अधिकारी यांना दिलेली कारणे दाखवा नोटीस मागे घ्यावी, आश्रमशाळेत भौतिक सुविधा उपलब्ध करून द्यावी, शिक्षक संवर्गातील प्रतिनियुक्त्या रद्द कराव्यात, प्राथमिक शिक्षक व माध्यमिक शिक्षकांना एकस्तर वेतनश्रेणीअंतर्गत पदोन्नतीची वेतनश्रेणी लागू करावी, प्रतीक्षा यादीतील कर्मचाऱ्यांना पदोन्नती द्यावी, प्रत्येक आश्रमशाळेत लीपिकाचे पद भरावे, अशा अनेक मागण्यांचा समावेश आहे.

शिष्टमंडळात संघटनेच्या राज्य सचिव करुणा लांजेवार, गडचिरोली जिल्हाध्यक्ष राधेश्याम पत्रे, गडचिरोली प्रकल्प अध्यक्ष देव बन्सोड, दत्तात्रय सूर्यवंशी, सुरेखा तेलतुंबडे, प्रसिद्धी प्रमुख सुधीर शेंडे, के.व्ही. कुंडगीर, विवेक विरुटकर, सी.जी. भिवगडे, विकास जनबंधू, रामदास शहारे, तुकाराम सोनकुसरे, पुरुषोत्तम डोंगरवार, सुनील कापगते, संतोष धोटे, पी.आर. शंभरकर , एन.जी. कांबळे , प्रदीप लोहकरे, पी.एम. चिमूरकर, बी.एल. लंजे, गुलाब हर्षे, डी.सी. शिंपी, एन.यू. मोहतुरे आदींसह शिक्षक उपस्थित होते.