एटापल्ली, सिरोंचा, अहेरी तालुक्यातील नागरिकांसोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद

अपर जिल्हाधिकाऱ्यांचा सुशासनाचा प्रयोग

अहेरी : मागील 12-13 दिवसांपासून अतिवृष्टीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद झाले. सिरोंचा, भामरागड ही तालुका मुख्यालये आणि अहेरी विभागातील अनेक गावांचा संपर्क तुटला होता. त्यामुळे एटापल्ली, सिरोंचा आणि अहेरी या तीनही तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी, आरोग्य उपकेंद्र आणि ग्रामस्थांशी ‘जनसंवादातून सुशासनाकडे’ या मोहिमेंतर्गत अहेरीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधून प्रत्यक्ष गावस्तरावरील परिस्थिती व नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या जाणून घेतल्या.

भाकरे यांनी आरोग्य अधिकाऱ्यांनी मुख्यालयी उपस्थित राहण्याबाबत, आरोग्य सेवेसंबंधी आवश्यक कामांसाठी निधीची मागणी करण्याबाबत, रस्ते वाहतूक सुरळीत ठेवण्याबाबत व नुकसानीचे पंचनामे वेळेत पूर्ण करण्याबाबत यंत्रणेला सूचना दिल्या. तसेच नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी प्रशासनापुढे व्यक्त करण्याचे आवाहन केले.

यावेळी वागेझरी येथील सर्पदंश झालेले रूग्ण बापूराव वासुजी शेंडे (56 वर्ष), तसेच आश्रमशाळा कोटमी येथील पोटात दुखत असल्यामुळे भरती झालेले अनिल माझी कवडो (15 वर्ष) या दोन रुग्णांशी व छत्तीसगड सीमेवरील कल्लेड, ता.अहेरी येथील नागरिकांसोबत भाकरे यांनी थेट संवाद साधला.