Home दैनंदिन बातम्या ‘कटाक्ष’च्या बातमीनंतर आरमोरी तालुक्यातील वाळूघाटांची मोजणी

‘कटाक्ष’च्या बातमीनंतर आरमोरी तालुक्यातील वाळूघाटांची मोजणी

देऊळगावचा घाट पुन्हा तपासणार

तीन फुटापेक्षा जास्त खालची वाळू काढता येत नसताना अशी सात फुटापर्यंत वाळू काढलेली दिसत आहे.

आरमोरी : तालुक्यातील काही वाळूघाटांवर बेसुमार वाळू उपसा केल्याचे वृत्त ‘कटाक्ष’मधून प्रकाशित झाल्यानंतर तहसीलदार उषा चौधरी यांनी सक्रिय होऊन घाटांची तपासणी करण्याचे निर्देश दिले. वघाळा घाटावरून किती वाळू काढली याची तपासणी केली जात आहे. इतरही घाटांची तपासणी केली जाणार आहे.

विशेष म्हणजे वादग्रस्त देऊळगाव घाटातून मोठ्या प्रमाणावर वाळू काढलेली असताना मंडळ अधिकाऱ्याने आठवडाभरापूर्वीच पंचनामा करून सर्वकाही ‘व्यवस्थित’ आहे, असा अहवाल दिला आहे. त्यामुळे येथील नियमबाह्य कारभारात महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी किती प्रमाणात गुंतले आहेत हे स्पष्ट होते. दरम्यान तहसीलदार उषा चौधरी यांना ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी पुन्हा तपासणी केली जाईल असे सांगितले.

वघाळा घाटावर खुलेआम पोकपेन मशिन लावून बेसुमारपणे वाळूचा उपसा केल्याची बाब गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडून तहसील कार्यालयाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले. तरीही तत्परतेने आणि ठोस कारवाई करण्याऐवजी तहसिल कार्यालय आढेवेढे घेत तपासणीच्या नावाखाली थेट कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहे. यावरून वाळू तस्करांशी तहसील कार्यालयाचे किती घनिष्ठ संबंध आहेत हे स्पष्ट होते.

देऊळगावच्या घाटांवर दिलेली हद्द सोडून मोठ्या प्रमाणावर वाळू काढण्यात आली. त्यामुळे निर्माण झालेले खड्डे अर्धवट बुजविण्याचाही प्रयत्न वाळू तस्करांनी केला. पण डोळ्यावर पट्टी बांधलेल्या महसूल यंत्रणेला ते अद्याप दिसलेले नाही. विशेष म्हणजे आज गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. हे पाणी उद्या किंवा परवा आरमोरी आणि गडचिरोलीपर्यंत पोहोचेल. त्यामुळे वाळू तस्करांची पापं या पाण्याखाली झाकली जाणार आहेत. त्यापूर्वी तपासणी करण्याची तत्परता महसूल विभागाची यंत्रणा दाखविणार का, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.