गडचिरोली : अहेरी पोलिसांनी पर्दाफाश केलेल्या अहेरीतील ऑनलाईन आयपीएल सट्ट्यात पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली. संदीप पुरपवार आणि इरफान शेख अशी त्यांची नावे आहेत. याआधी सोमवारी चार लोकांना अटक केली होती. अहेरी न्यायालयाला सुटी असल्याने या सर्व आरोपींना मंगळवारी संध्याकाळी चामोर्शी न्यायालयापुढे हजर करण्यात आले. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी आरोपींची पोलिस कोठडी आवश्यक असताना न्यायालयाने ती नाकारून आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्यामुळे पोलिस यंत्रणेलाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. या सर्व आरोपींना मंगळवारी संध्याकाळी चंद्रपूरच्या कारागृहात रवाना करण्यात आले.
या प्रकरणातील काही आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाही. त्यांचा शोध सुरू आहे. दरम्यान अहेरीतील बालाजी गेस्ट हाऊस या ठिकाणी चालणाऱ्या या ऑनलाईन सट्ट्याचे सूत्रधार असलेल्या संदीप गुडपवार आणि इरफान शेख यांनाही पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात एकूण १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्वजण स्थानिक आहेत. मात्र बनावट अॅपच्या माध्यमातून खेळल्या जात असलेल्या या सट्ट्याचे कनेक्शन कुठपर्यंत आहे याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले आहे.
या प्रकरणाचा तपास अहेरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक दशरथ वाघमोडे आणि त्यांचे सहकारी करीत आहेत.
(महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा वाचा खाली)