गडचिरोली : तब्बल 30 वर्षांपासून नक्षल चळवळीत काम करणाऱ्या आणि एरिया कमिटी मेंबर (एसीएम) पदावर कार्यरत असलेल्या रामसु दुर्गु पोयाम ऊर्फ नरसिंग (55 वर्ष) याने आत्मसमर्पण केले. त्याच्यासोबत छत्तीसगडमधील दलम सदस्य असलेल्या रमेश शामू कुंजाम उर्फ गोविंद उर्फ रोहित (25 वर्ष) यानेही जिल्हा पोलीस आणि सीरआरपीएफ दलापुढे अहेरीतील प्राणहिता पोलीस उपमुख्यालयात आत्मसमर्पण केले. अनेक गंभीर गुन्ह्यात सहभाग असलेल्या रामसु याच्यावर 6 लाखांचे तर रमेश याच्यावर 2 लाखांचे ईनाम शासनाने ठेवले होते.
रामसु ऊर्फ नरसिंग हा धानोरा तालुक्यातील गट्टानेली येथील रहिवासी आहे, तर रमेश ऊर्फ गोविंद ऊर्फ रोहित हा छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यातील वेडमेट्टा येथील रहिवासी आहे.
रामसु ऊर्फ नरसिंग पोयाम हा सन 1992 मध्ये टिपागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन सन 1995 पर्यंत कार्यरत होता. त्यानंतर काकुर दलममध्ये 1996 पर्यंत माओवाद्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमांना सुरक्षा देण्याचे काम करीत होता. सन 1996 ते 1998 पर्यंत पुन्हा टिपागड दलममध्ये कार्यरत होता. सन 1998 मध्ये माड एरिया (छ.ग.) येथे बदली होऊन पुरवठा टिममध्ये 2001 पर्यंत कार्यरत होता. सन 2001 ते 2002 पर्यंत प्रेस टिममध्ये प्रशिक्षणाकरीता कार्यरत होता. सन 2002 मध्ये एरीया कमिटी मेंबर (एसीएम) पदावर पदोन्नती होऊन माओवाद्यांसाठी कृषी कामाकरीता कोडतामर्का गाव परिसरात सन 2005 पर्यंत कार्यरत होता. सन 2005 ते 2010 या कालावधीत मौजा डुमनार, फरसगाव व कोडेनार या गावांमध्ये माओवाद्यांसाठी कृषीची कामे करत होता. सन 2010 ते आजपावेतो कुतुल आणि नेलनार दलममध्ये एरिया कमिटी मेंबर (एसीएम) पदावर कार्यरत होता. रामसु ऊर्फ नरसिंग याच्यावर आजपर्यंत 12 गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये 6 चकमकी, 5 हत्या व एका दरोड्याचा समावेश आहे.
रमेश ऊर्फ गोविंद ऊर्फ रोहित हा सन 2019 मध्ये मिलिशिया म्हणून माओवाद्यांची कामे करत होता. सन 2020 मध्ये चेतना नाट्यमंच (सीएनएम) येथे सदस्य पदावर भरती झाला. सन 2021 मध्ये कुतुल दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन आतापर्यंत कार्यरत होता. त्याच्या हिंसक घटनांमधील सहभागाची पडताळणी करणे सुरु आहे.
आत्मसमर्पित होण्याची कारणे
गडचिरोली पोलीस दलाच्या आक्रमक नक्षलविरोधी अभियानामुळे त्यांचे कंबरडे मोडले आहे. सोबतच्या सदस्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आल्याने व घरातील सर्व सदस्य तथा नातेवाईकांनी आत्मसमर्पण करण्यासाठी प्रवृत्त केल्यामुळे यांनी आत्मसमर्पणाचा मार्ग पत्करला. वरिष्ठ माओवादी नेते फक्त स्वत:च्या फायद्यासाठी गरीब आदिवासी युवक-युवतींचा वापर करून घेतात यामुळे नक्षल चळवळीतील सदस्यांचे मनोबल खचले आहे.
वर्षभरात 20 जणांचे आत्मसमर्पण
वर्ष 2024 मध्ये आतापर्यंत 20 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. याशिवाय सन 2022 ते आतापर्यंत एकुण 33 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यात अनेक जहाल माओवाद्यांचा समावेश आहे. ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, सीआरपीएफचे पोलीस उपमहानिरीक्षक (अभियान) अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, सीआरपीएफचे प्रभारी समादेशक सुजीत कुमार (37 बटालियन) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.