16 हजार सुरक्षा जवानांच्या संरक्षणात पार पडणार संपूर्ण निवडणूक प्रक्रिया

170 आत्मसमर्पितही करणार मतदान

सुरक्षा दलाचे जवान आणि मतदान कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देताना जिल्हाधिकारी संजय दैने व इतर अधिकारी

गडचिरोली : विधानसभा निवडणूक प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी गडचिरोली पोलीस दल पूर्ण तयारीनिशी सज्ज आहे. जिल्हा पोलीस दलाच्या मदतीला केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, राज्य सशस्त्र पोलीस दलाच्या 111 कंपन्या, तसेच नागपूर शहर, महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक व पोलीस प्रशिक्षण केंद्र नागपूर अशा विविध ठिकाणांवरून 500 पोलीस अधिकारी व अंमलदार, तसेच स्थानिक 700 च्या वर गृहरक्षक दलाच्या सुरक्षा जवानांना मिळून 16 हजारांवर सुरक्षा जवानांचा फौजफाटा मतदान केंद्रांवर आणि इतरत्र तैनात करण्यात आला आहे.

या सुरक्षा जवानांना निवडणुकीच्या अनुषंगाने विशेष प्रशिक्षणही देण्यात आले आहे. यासोबतच जिल्ह्रातील 367 अतिसंवेदनशिल मतदान केंद्रांवर केंद्रीय सशस्त्र पोलीस दल तैनात करण्यात आलेले असून सी-60 पथकांसह इतर सुरक्षा दलाच्या 36 तुकड्यांमार्फत जिल्ह्रातील अतिसंवेदनशिल जंगल परिसरात माओवादविरोधी अभियान राबविण्यात येणार आहे.

जिल्हा पोलीस दलाचे जवान निवडणूक बंदोबस्तात तैनातीस असल्याने त्यांना स्वत:चे मतदान करता येत नव्हते. त्यामुळे टपाली मतदानाद्वारे 2979 जणांनी मतदान केले. यासोबतच 170 आत्मसमर्पित माओवादी हे सुद्धा पोलिसांच्या मदतीने निवडणुकीत मतदान करुन आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

130 ड्रोन कॅमेऱ्यांमधून निरीक्षण

जिल्ह्रातील सर्व मतदान केंद्रांवर आकाशमार्गाने देखील सुक्ष्म पाहणी करण्यासाठी अत्याधुनिक 130 ड्रोनसह सुसज्ज ड्रोन टीमही आकाशात डोळा म्हणून काम करेल. माओवाद्यांकडून ड्रोनवर हल्ला झाल्यास प्रतिहल्ला करण्यासाठी 5 अँटीड्रोन गन देखिल सज्ज राहतील. निवडणूक काळात मतदान केंद्रापर्यंत जाण्या-येण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या मार्गावर बॅाम्बरोधक वाहनांचा उपयोग करून सुमारे 750 कि.मी.मार्ग सुरक्षित केला जाणार आहे.

वायुसेना-थलसेनेचे 5 हेलिकॅाप्टर दिमतीला

भारतीय वायुसेनेचे 3 एमआय-17 व भारतीय लष्कराचे 2 एएलएच असे 5 हेलिकॉप्टर गडचिरोली पोलीस दलाच्या मदतीला तैनातीस आहेत. गडचिरोली पोलिस दलाच्या 2 हेलीकॉप्टरसह एकुण 7 हेलिकॉप्टरच्या सहाय्याने गडचिरोलीतील विविध संवेदनशिल व अतिसंवेदनशिल ठिकाणी मतदान कर्मचाऱ्यांना पाठविणे सुरू आहे. जिल्ह्याच्या सिमावर्ती भागात व तेलंगणा आणि छत्तीसगड लगतच्या जिल्ह्रांच्या मदतीने निवडणुकीच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर माओवादविरोधी अभियान राबविण्यात येणार आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची नजर

निवडणूक शांततापूर्ण वातावरणात निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी संपूर्ण केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, विविध राज्यातील पोलीस दल तसेच राज्यातील विविध विभागातील पोलीस दल, गृहरक्षक दल आदींची मदत घेतली जात आहे. यासोबत अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) सुनील रामानंद, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक (गडचिरोली परिक्षेत्र) अंकित गोयल, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) श्रेणिक लोढा हे वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. जिल्ह्रातील नागरिकांना भयमुक्त वातावरणामध्ये पुढे येऊन मतदान करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले आहे.