
गडचिरोली : जिल्ह्यातील 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांना हृदयरोग असल्याचा संशय असल्याने निश्चित निदान करण्यासाठी दोन दिवसीय 2-डी इको तपासणी शिबिराचे आयोजन दि.28 व 29 सप्टेंबर रोजी केले होते. “सेवा संकल्प अभियाना”अंतर्गत जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र (DEIC) व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर जिल्हा महिला व बाल रुग्णालयात घेण्यात आले.
जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा महिला व बाल रुग्णालय गडचिरोली, तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर घेण्यात आले. शिबिरासाठी बाल हृदयरोग तज्ज्ञ डॉ.भूषण चव्हाण यांनी सेवा देत बालकांची 2-डी इको तपासणी केली. पहिल्या दिवशी 82 तर दुसऱ्या दिवशी 60, अशा एकूण 142 बालकांची तपासणी करण्यात आली.
सदर शिबिरासाठी जिल्ह्यातील RBSK पथकांमार्फत प्राथमिक तपासणीमध्ये संशयित हृदयरोग आढळलेली बालके/विद्यार्थ्यांना, तसेच SNCU मधील नवजात बालके व इतर ठिकाणांहून संदर्भित बालकांना तपासणीसाठी आणण्यात आले. 2-डी इको तपासणीद्वारे निदान निश्चित झालेल्या पात्र बालकांच्या पुढील उपचार व आवश्यक शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. त्यासाठी आवश्यक तृतीयस्तरीय संदर्भ सेवा व पुढील उपचारांचे नियोजन DEIC, गडचिरोलीमार्फत लवकरच करण्यात येणार आहे.
या उपक्रमामुळे जिल्ह्यातील संशयित हृदयरोग असलेल्या बालकांना वेळेत तज्ज्ञ तपासणी, अचूक निदान तसेच पुढील उपचार व शस्त्रक्रियेसाठी आवश्यक संदर्भ सेवा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे.
































