कुरखेडा : सहाय्यक गटविकास अधिकारी देवांश उराडे यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात तालुका सरपंच संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या बेमुदत उपोषणाची अखेर सांगता करण्यात आली. उराडे यांची विभागीय चौकशी केली जाणार आहे, शिवाय त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविले जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. उपोषणस्थळी माजी आमदार कृष्णा गजबे यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी संवाद साधला. पदाधिकारी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर गजबे यांनी लिंबूपाणी पाजून उपोषण सोडविले.
कुरखेडा तालुक्यातील सरपंच संघटनेच्या वतीने वादग्रस्त सहाय्यक गटविकास अधिकारी देवांश उराडे यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कुरखेडात बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले होते. या उपोषणादरम्यान सरपंच आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांबाबत चर्चा केली. ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गावांच्या विकासासाठी काम करताना येणाऱ्या अडचणींसंदर्भात सुद्धा चर्चा करण्यात आली.
माजी आमदार कृष्णा गजबे यांनी उपोषणकर्त्यांना लिंबू पाणी देऊन सांगता केली. यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष चांगदेव फाये, गटविकास अधिकारी धीरज पाटील, सागर निरंकारी, उल्हास देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपोषणाची सांगता झाल्यानंतर उपस्थित सरपंच व पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी सरपंचांच्या मागण्या व ग्रामपंचायतींसमोरील प्रश्नांवर चर्चा केली. ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गावातील विकासकामे प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रशासन आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय राहण्याची गरज व्यक्त करण्यात आली. उपस्थितांनी ग्रामपंचायतींच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. उपोषणस्थळी झालेल्या या चर्चेमुळे सरपंच संघटनेचे पदाधिकारी, सरपंच आणि प्रशासनातील अधिकारी एकाच ठिकाणी उपस्थित राहून विविध विषयांवर चर्चा करण्याची संधी मिळाली.
































