गडचिरोली : भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहरतर्फे सेवा संकल्प अभियानांतर्गत शहरातील इंदिरानगर येथे विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, बक्षीस वितरण, वृक्षारोपण आणि नोटबुक वितरण अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. गडचिरोली नगर परिषदेच्या अध्यक्ष ॲड.प्रणोती सागर निंबोरकर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नगराध्यक्ष निंबोरकर म्हणाल्या, विद्यार्थी ही देशाची भावी संपत्ती आणि भविष्य आहेत. त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना व कलाकौशल्याला योग्य व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यास त्यांचा आत्मविश्वास द्विगुणित होतो. सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजित चित्रकला स्पर्धेसारखे उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणारे असून हा निश्चितच स्तुत्य उपक्रम आहे.
चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कल्पकतेचे आणि कलागुणांचे दर्शन घडविले. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य म्हणून नोटबुकचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षांचे संगोपन आणि पर्यावरण संरक्षणाबाबत नागरिक व विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.
या कार्यक्रमाला भाजपचे शहराध्यक्ष तथा नगर परिषद बांधकाम सभापती अनिल कुनघाडकर, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहणकर, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा सचिव तथा नगरसेवक सुधाकर येनगंधलवार, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल करपे, जिल्हा सचिव तथा नगरसेविका वर्षा शेडमाके, नगर परिषद सभापती सीमा कन्नमवार, उपनगराध्यक्ष निखिल चरडे, सभापती हर्षल गेडाम, उपसभापती शिल्पा गव्हारे, तसेच नगरसेविका धंदरे यांच्यासह भाजपा शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी, पालक व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
































