सिरोंचा : येथील परिवर्तन भवन परिसर, शाहूनगर येथे मिलिंद बहुद्देशीय विकास मंडळ व नालंदा चॅरिटेबल ट्रस्टद्वारा आयोजित फुले, शाहू, आंबेडकर महोत्सवातील परीसंवादाचा उद्घाटन आ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी फुले, शाहू, आंबेडकरांचे विचारच देशाला तारू शकतात, असे सांगत त्यांच्या विचारांचे महत्व सांगितले.
‘दक्षिण मध्य भारतात परिवर्तन भवनाची भूमिका व कार्य’ आणि ‘भारतीय संविधान व समाज चेतना’ असे परिसंवादाचे विषय होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार पेंटा रामा तलांडी, तर विचारपिठावर प्रमुख अतिथी म्हणून अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम, डॉ.मिताली आत्राम, सामाजिक कार्यकर्त्या निता तलांडी, नगरसेवक सतीश भोगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मधुकर कल्लुरी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष समय्या पसुला, जगदीश रालबंडीवार, सत्यनारायण परपटलावार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ.धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी विषमता नष्ट करून देशात समानता प्रस्थापित केली. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचे महोत्सव होणे काळाची गरज असल्याचे म्हणत त्यांनी मोलाचे मार्गदर्शन यावेळी केले. कार्यक्रमाचे संचालन रवी कार्सपल्ली यांनी तर आभार शंकर कावरे यांनी मानले.
समता सैनिक दलाचे पथसंचलन
मान्यवरांचे कार्यक्रमस्थळी आगमन होताच समता सैनिक दल व मरपल्ली येथील भीमसैनिक, युवकांनी मान्यवरांच्या गळ्यात निळा गमचा घालून व पथसंचलन करून त्यांचे स्वागत केले. यावेळी परीसर निळामय झाला होता. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा आनंद व उत्साह संचारला होता. दुपारी सिरोंचा शहरातून रॅलीही काढण्यात आली.