आजपासून 50 केंद्रांवर बारावीची परीक्षा, जिल्ह्यात 27 केंद्र संवेदनशिल

13 हजार 424 विद्यार्थी झाले सज्ज

गडचिरोली : विद्यार्थ्याच्या शालेय जीवनातील टर्निंग पॅाईंट समजल्या जाणाऱ्या राज्य मंडळाच्या बारावीच्या परीक्षेला आजपासून (दि.11) सुरूवात होत आहे. विज्ञान, कला आणि वाणिज्य मिळून जिल्ह्यात एकूण 50 केंद्रांवर 13 हजार 424 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. विशेष म्हणजे अर्ध्यापेक्षा अधिक, म्हणजे 27 केंद्र संवेदनशिल असल्याने त्या केंद्रांवर कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी शिक्षण विभागासह जिल्हा प्रशासनाची यंत्रणा सज्ज झाली आहे.

सकाळी 11 वाजता इंग्रजी भाषेच्या पेपरने या परीक्षेला सुरूवात होणार आहे. कॅापीसारखे गैरप्रकार टाळण्यासाठी आणि ही परीक्षा निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वातील दक्षता समितीसह जिल्हास्तरीय भरारी पथक सज्ज राहणार आहे. विशेष म्हणजे परीक्षा केंद्र परिसरातील हालचाली टिपण्यासाठी व्हिडीओ कॅमेऱ्यांसह ड्रोन कॅमेऱ्यांचीही मदत घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

केंद्राच्या परिसरासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांच्या 200 मीटर परिसरात मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. जिल्हा दंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये हा आदेश जारी केला आहे.

बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 आणि दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत होणार आहे. यादरम्यान परीक्षा केंद्रांच्या 200 मीटर परिसरात झेरॉक्स मशीन, फॅक्स, एसटीडी बुथ यांसारख्या सुविधांना तसेच परीक्षेच्या दरम्यान मोबाईल फोन, लॅपटॉप, पेजर, टेपरेकॉर्डर, कॅमेरा यांसारख्या उपकरणांचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.

निषिद्ध क्षेत्रात नारेबाजी, गाणी, वाद्य वाजवणे, भाषण करणे तसेच पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. शस्त्रे, स्फोटक किंवा दाहक पदार्थ बाळगण्यास बंदी घालण्यात आली आहे. परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात चुन्याची रेषा आखण्यात येणार असून, कोणत्याही अनधिकृत व्यक्तींना किंवा वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही.

कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिस यंत्रणेला योग्य सुरक्षा व्यवस्था तैनात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परीक्षा शांततेत पार पडावी यासाठी हा आदेश परीक्षेच्या कालावधीत अंमलात राहील. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा आदेश जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी जारी केला आहे.