गडचिरोली : येथील एमआयडीसी परिसरात असलेल्या उद्योगांच्या अडचणी जाणून घेऊन उद्योगांना चालना देण्यासाठी लॉयड्स मेटल्सने पुढाकार घेतला आहे. गडचिरोली एमआयडीसी परिसरात असलेल्या उद्योजकांना काम मिळावे, त्यांच्या उत्पादनांचा वापर लॉयड्स मेटल्स कंपनीत केला जावा, अशी मागणी एमआयडीसी इंडस्ट्रीएल असोसिएशनचे अध्यक्ष अतुल बोमनवार यांनी यावेळी केली.
असोसिएशनच्या मागणीनुसार 30 ऑगस्ट रोजी लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे संचालक विक्रम मेहता व लॉयड मेटल्सचे उपाध्यक्ष अमित गुप्ता यांनी येथील एमआयडीसीला भेट देऊन सुरू असलेल्या उद्योगांची पाहणी केली. याशिवाय असोसिएशनच्या पदाधिकार्यांशी चर्चा करुन त्यांच्या अडचणी व त्यांच्या समस्या सुद्धा जाणून घेतल्या. असोसिएशनच्या पदाधिकार्यांनी स्थानिक उद्योजकांना चालना देण्यासाठी लॉयड मेटल्सने पुढाकार घेऊन येथील उद्योजकांना काम देण्याची मागणी केली.
यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष अतुल बोमनवार, उपाध्यक्ष मलिक बुधवानी, कोषाध्यक्ष निकेतन गद्देवार, सचिव तेजस अल्लादवार आदींसह इतरही उद्योजक उपस्थित होते. यावेळी मेहता यांनी एमआयडीसी असोसिएशनच्या मागणीचा विचार करुन त्यांना लागणारी मदत लॉयडस् मेटल्सच्यावतीने देण्याची ग्वाही दिली.