लॅायड्स मेटल्सच्या विविध उपक्रमांचे नवर्षारंभी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

सूत्रं हाती घेतल्यानंतरचा पहिलाच दौरा

गडचिरोली : वर्ष 2025 च्या पहिल्याच दिवशी, म्हणजे 1 जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते कोनसरी येथे लॅायड्स मेटल्सच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले जाणार आहे. नव्याने मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच गडचिरोली दौरा आहे.

गेली अडीच वर्ष देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री होते. आता मुख्यमंत्री झाल्यानंतरही त्यांनी गडचिरोलीचे पालकत्व घेण्याची ईच्छा लपवून ठेवलेली नाही. अशा स्थितीत नवीन वर्षाची सुरूवात ते गडचिरोलीच्या दौऱ्याने करणार असल्यामुळे या दौऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे.

या प्रकल्पांचे होणार उद्घाटन आणि भूमिपूजन

बुधवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लॅायड्सच्या डीआरआय प्लान्टचे उद्घाटन, लॅायड्स राज विद्यानिकेतन (सीबीएसई शाळा), लॅायड्स काली अम्माल मेमोरिअल हॅास्पिटल, लॅायड्स वन्या क्लोदिंग कंपनी, फॅमिली क्वॅार्टर्स, पोलीस अॅाफिसर्स फॅमिली क्वॅार्टर्स, जिमखाना, बालोद्यान आदींचे उद्घाटन होणार आहे. याशिवाय स्लरी पाईपलाईन, पॅलेट प्लान्ट आणि आयरन ओर ग्राइंडिंग युनिटचे भूमिपूजन केले जाणार आहे.

भाजप पदाधिकाऱ्यांनी केली तयारीची पाहणी

मंगळवारी भाजपचे राष्ट्रीय महामंत्री (एसटी मोर्चा) तथा माजी खासदार अशोक नेते यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कोनसरी येथील कार्यक्रमस्थळी भेट देऊन तयारीची पाहणी केली. यावेळी आ.डॅा.मिलिंद नरोटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, ज्येष्ठ नेते बाबुरावजी कोहळे, प्रदेश प्रतिनिधी रविंद्र ओल्लालवार, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रा.रमेश भारसागडे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, तालुकाध्यक्ष आनंद भांडेकर, प्रकाश दत्ता, भास्कर बुरे या पदाधिकाऱ्यांसह लॅायड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बी.प्रभाकरण, कार्यकारी संचालक एस.व्यंकटेश्वरण, बलराम सोमनानी व इतर अधिकारी उपस्थित होते.