गडचिरोलीत उद्या पदयात्रेतून गुंजणार ‘जय शिवाजी, जय भारत’चा नारा

सहभागी व्हा, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

xr:d:DAFL_BGRlWk:2181,j:3930291219,t:23021902

गडचिरोली : छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती 19 फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेसह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

ही पदयात्रा सकाळी 7.30 वाजता जिल्हा परिषद हायस्कूल येथून प्रारंभ होईल. इंदिरा गांधी चौक – कारगील चौक – आय.टी.आय.चौक – छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, शासकीय विश्रामगृह मार्गे कॉम्प्लेक्स समोरील उद्यान येथे समाप्त होईल. या पदयात्रेमध्ये विद्यार्थी आणि विविध शासकीय विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

स्थानिक नागरिकांनीही सकाळी 7.30 वाजता जिल्हा परिषद हायस्कूल चामोर्शी रोड येथे उपस्थित राहून पदयात्रेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे. या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी नियोजनाचा आढावा घेत पदयात्रेचा मार्ग ठरविणे, विद्यार्थ्यांचा सहभाग निश्चित करणे, क्रीडांगण सुसज्ज ठेवणे आणि स्वच्छतेची व्यवस्था करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी सर्व विभागांशी समन्वय साधत कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.