गडचिरोली : निसर्गाचे वरदान लाभलेला गडचिरोली जिल्हा संस्कृती, भाषा व साहित्यदृष्ट्याही अतिशय समृद्ध आहे. आता येथे विदर्भ साहित्य संघाची जिल्हा कार्यकारिणी कार्यरत होत आहे. त्यामुळे साहित्यिक, नवसाहित्यिकांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते यांनी दिली.
स्थानिक स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात विदर्भ साहित्य संघाच्या गडचिरोली जिल्हा शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते मार्गदर्शन करत होते. उद्घाटन विदर्भ साहित्य संघाचे केंद्रीय सदस्य डॅा.श्याम मोहरकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भ साहित्य संघाचे सरचिटणीस विलास मानेकर, साहित्यिक श्याम माधव धोंड, इंद्रजित ओरके, तीर्थराज कापगते, आर्थिक व सामाजिक विकास संस्थेचे सचिव सतीश चिचघरे, गडचिरोली जिल्हा शाखेचे अध्यक्ष प्रा.डॅा.नरेंद्र आरेकर, रामचंद्र वासेकर, सचिव रामचंद्र वासेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रदीप दाते म्हणाले, विदर्भ साहित्य संघ ही साहित्य क्षेत्रातील अतिशय अनुभवी आणि नामांकित संस्था आहे. विदर्भ साहित्य संघाच्या माध्यमातून अनेक साहित्यिक पुढे आले आणि त्यांनी साहित्यसेवा करत रसिकांना आनंद दिला. गडचिरोली जिल्ह्यात संस्थेची कार्यकारिणी असावी. त्या माध्यमातून या जिल्ह्यातील साहित्यिकांना प्रेरणा, सहकार्य व येथील साहित्य चळवळीला बळ मिळावे, अशी अनेक वर्षांची इच्छा होती. ती इच्छा आज पूर्ण झाली आहे. या जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकारी, सदस्य हे तडफदार, उत्साही असल्याने हा जिल्हा साहित्यविश्वात ठळकपणे दिसेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
डॅा.श्याम मोहरकर यांनी विदर्भ साहित्य संघाच्या वाटचालीची माहिती देताना विदर्भातील साहित्य चळवळीत असलेल्या योगदानाबद्दल सांगितले. साहित्यिक श्याम माधव धोंड यांनी अनेक कवींच्या कविता सादर केल्या. सकस वाचन करण्याचे आवाहनही त्यांनी स्थानिक साहित्यिकांना केले.
गडचिरोली जिल्हा कार्यकारिणीचे अध्यक्ष प्रा.डॅा.नरेंद्र आरेकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून विदर्भ साहित्य संघाची शाखा गडचिरोली जिल्ह्यात स्थापन झाल्याने येथील साहित्यविश्वात उत्साह निर्माण झाल्याचे सांगत ज्येष्ठांच्या मार्गदर्शनात ही कार्यकारिणी उत्तम कार्य करेल, असा विश्वास व्यक्त केला. जिल्हा कार्यकारिणीचे उपाध्यक्ष प्रमोद बोरसरे यांनी आपल्या मनोगतातून विदर्भ साहित्य संघाने तळागाळातील कवी, लेखकांना दिलेल्या मदतीच्या हातांचा आवर्जून उल्लेख केला. यावेळी इतर मान्यवरांनीही समयोचित विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन गौरी तळवलकर यांनी केले, तर आभार रामचंद्र वासेकर यांनी मानले.
हे आहेत गडचिरोली शाखेचे पदाधिकारी
विदर्भ साहित्य संघाच्या गडचिरोली जिल्हा कार्यकारिणीत कार्याध्यक्ष डॅा.सविता गोविंदवार, उपाध्यक्ष प्रमोद बोरसरे, डॅा.विलास खुणे, सचिव रामचंद्र वासेकर, सहसचिव डॅा.गणेश चुदरी, कोषाध्यक्ष प्रा.प्रदीप चापले, प्रसिद्धी प्रमुख मिलिंद उमरे, साहित्य व सांस्कृतिक प्रमुख चेतन गोरे आदींचा समावेश आहे.