

भामरागड : तीन नद्यांच्या पुरामुळे तीन दिवस जलमय अवस्थेत असलेल्या भामरागड शहरातील पुराचे पाणी काल सोमवारी ओसरले. याशिवाय रात्री 10 वाजताच्या सुमारास पर्लकोटा नदीवरच्या पुलावरचेही पाणी उतरल्यानंतर मु्ख्य मार्गावरील चार दिवसांची वाहतूक कोंडी दूर झाली. त्यामुळे संपर्काबाहेर असलेल्या अनेक गावांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान नगर पंचायतने सर्वत्र स्वच्छता अभियान राबवून रस्त्यावर साचलेला चिखल साफ केला.
ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याच्या डबक्यांमुळे रोगराई पसरणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. मलेरिया नियंत्रण विभागाचीही चमू त्यासाठी कामाला लागली आहे. याशिवाय दूषित झालेले पाण्याचे स्रोत क्लोरिन पावडरच्या माध्यमातून शुद्ध करण्याच्या कामानेही वेग घेतला आहे.
छत्तीसगडमधून वाहात येणाऱ्या पर्लकोटा, पामुलगौतम आणि इंद्रावती नद्यांना तिकडच्या जोरदार पावसानंतर मोठा पूर येऊन या पुराने भामरागडला घेरले होते. तीन दिवस जलमय स्थितीत असलेल्या भामरागड आणि तालुक्यातील अनेक गावांनी यादरम्यान विविध आपत्तींचा सामना केला. पण तालुका प्रशासन, एसडीआरएफची चमू, स्थानिक पोलीस आणि मदतीला लॅायड्स मेटल्सचे वैद्यकीय पथक तथा हेलिकॅाप्टर आल्यामुळे कोणतीही जीवित हाणी न होता रुग्णांना वेळेवर वैद्यकीय उपचार मिळण्यास मदत झाली. पुरानंतरच्या परिस्थितीमुळे रोगराई उद्भवू नये म्हणून लॅायड्स मेटल्सच्या हेडरी येथील काली अम्मल रुग्णालयाचे पथक भामरागडमध्ये सेवा देत आहे.
दरम्यान दरवर्षीच्या या संकटातून कायमची सुटका करण्यासाठी आमचे योग्य आणि सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करावे, अशी मागणी भामरागडमधील काही नागरिकांनी केली आहे.































