लॉयड्सच्या वाढीव प्रकल्पांसाठीच्या जनसुनावणीत सर्वांचा समर्थनाचा सूर

गडचिरोली : जिल्ह्याला औद्योगिक नकाशावर आणणाऱ्या लॉयड्स मेटल्स अॅण्ड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या सुरजागड लोहखाणीतील वाढीव उत्खननासाठी मंगळवारी (दि.28) पर्यावरणविषयक जनसुनावणी घेण्यात आली. सुरजागड, हेडरी परिसरातील 30 गावांमधील सरपंच, पदाधिकारी आणि नागरिकांनी या जनसुनावणीला हजेरी लावत वाढीव नियोजनाला समर्थन देण्याचा सूर आळवला. मात्र औद्योगिक विकासासोबतच नागरिकांच्या सर्वांगिन विकासाची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात ही पर्यावरणविषयक जनसुनावणी पार पडली. भरगच्च भरलेले सभागृह कमी पडेल याची कल्पना असल्याने सभागृहाच्या बाहेरही पेंडॅाल टाकून मोठ्या स्क्रिनवर सभागृहातील चर्चा ऐकण्याची सुविधा करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्यासह महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी मंचावर विराजमान होते. याशिवाय विशेष पाहुणे म्हणून खा.डॉ.नामदेव किरसान, माजी मंत्री तथा अहेरीचे आ.धर्मरावबाबा आत्राम, आरमोरीचे आ.रामदास मसराम, गडचिरोलीचे आ.डॉ. मिलिंद नरोटे, माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार डॉ.देवराव होळी, माजी आमदार दीपक आत्राम, पद्मश्री आणि ज्येष्ठ नाट्य कलावंत परशुराम खुणे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार, पुरसलगोंदीच्या सरपंच अरुणा सडमेक, तोडसाच्या सरपंच वनिता कोरमी, उपसरपंच प्रशांत आत्राम, नागुलवाडीचे सरपंच गावडे, बुर्गीचे सरपंच व उडेराचे सरपंच तसेच प्रकल्पबाधित क्षेत्रातील सर्व ग्रामपंचायतींचे सदस्य, गाव पाटील, भूमिया, गायता आणि नागरिक, तसेच लॉयड्सचे व्यवस्थापकीय संचालक बी.प्रभाकरन उपस्थित होते.

सुरजागड लोहप्रकल्पामुळे मिळाले हाताला काम

एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोह प्रकल्पामुळे स्थानिक नागरिक, युवक, युवतींच्या हाताला काम मिळाले आहे. त्यामुळे या भागातील युवक-युवती आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत. लॅायड्स मेटल्स कंपनीच्या माध्यमातून या भागात रोजगार निर्मितीला वेग देण्यात आला असून या ठिकाणी नव्याने तब्बल 6 हजार युवक-युवतींची पदभरती केली जाणार आहे. या कंपनीमध्ये अहेरी विधानसभा क्षेत्रातील स्थानिक युवकांना प्राधान्य देण्याची मागणी उपस्थित लोकप्रतिनिधींनी या जनसुनावणीच्या वेळी केली.

हेडरीप्रमाणे आलापल्ली किंवा अहेरीत द्या रुग्णालय

लॅायड्सने हेडरी येथे सुसज्ज असे रुग्णालय निर्माण करून अतिदुर्गम एटापल्ली तालुक्यातील रुग्णांसाठी योग्य उपचाराची सोय करून दिली आहे. असेच रुग्णालय आलापल्ली किंवा अहेरी येथे सुरू करून या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान परिसरातील नागरिकांनी या प्रकल्पामुळे परिसराचा विकास, आरोग्य, शिक्षण, रोजगाराची मागणी करतानाच पर्यावरण संतुलन राखले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

पर्यावरण आणि संस्कृतीला बाधा नाही

लॅायड्स मेटल्सने रुग्णालयासोबत परिसरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सीबीएसई अभ्यासक्रमाची शाळा सुरू केली आहे. त्यामुळे या भागातील गरजू, गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षणाची सोय झाली आहे. परिसरातील पर्यावरण व संस्कृतीला कुठलीही बाधा पोहोचणार नसल्याने शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी, रस्ते आदी सुविधा निर्माण करण्याकडे कंपनीने लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली.

सर्वांचाच सकारात्मक प्रतिसाद

लॉयड्स मेटल्स अॅण्ड एनर्जी लि. सुरजागड यांनी त्यांच्या कार्यरत असलेल्या खाणीच्या 348.09 हेक्टर क्षेत्रामध्ये 10 ते 26 दशलक्ष टन प्रतिवर्ष हेमॅटाइट, 45 दशलक्ष टन प्रतिवर्ष (बीएचक्यू प्लान्ट), 45 दशलक्ष टन प्रतिवर्ष क्षमतेचे कमी दर्जाचे लोह खनिज / बँडेड हेमॅटाईट क्वॉर्टझाईट (बीएचक्यू), 5 दशलक्ष टन प्रतिवर्ष घनकचरा (एकूण उत्खनन – ६० दशलक्ष टन प्रतिवर्ष) यासह सुरजागड लोहखनिज खाणी लीज क्षेत्रावरील क्रशिंग आणि स्क्रिनिंग प्लांटसह लोह खनिज उत्पादन क्षमतेच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार पर्यरणविषयक जनसुनावणी घेण्याचा निर्णय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या चंद्रपूर कार्यालयाने घेतला होता. एटापल्ली तालुक्यातील नागुलवाडी, मोहर्ली, कारमपल्ली, एकरा खुर्द, झारेवाडा, पेठा, मरकल, रेकनार, आलदंडी, परसलगोंदी, पुरसलगोंदी, हेडरी, बांडे, मुंगेर, गोडेल, इतलनार, सुरजागड, नेंडेर, मलमपाड (मल्लम पहाडी) ही गावे या प्रकल्पाच्या प्रभाव क्षेत्रात येणार आहेत.

या प्रस्तावित प्रकल्पाकरिता भारत सरकारच्या पर्यावरण व वने व मंत्रालयाच्या 1 डिसेंबर 2009 च्या सुधारित अधिनियमान्वये ही पर्यावरणविषयक जनसुनावणी आयोजित करण्यात आली होती. जनसुनावणीला उपस्थित प्रभाव क्षेत्रातील सर्वच गावातील नागरिकांनी या प्रकल्पाला सकारात्मक प्रतिसाद देत स्वागत केले.