Home दैनंदिन बातम्या उन्हाळी क्रीडा शिबिरातून देणार विविध खेळ कौशल्याला चालना

उन्हाळी क्रीडा शिबिरातून देणार विविध खेळ कौशल्याला चालना

सायन्स कॅालेजमध्ये उद्घाटन

गडचिरोली : येथील शासकीय विज्ञान महाविद्यालयात (सायन्स कॅालेज) जिल्हा क्रीडा कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘स्पोर्ट समर कॅम्प 2026’ चे उद्घाटन आमदार डॅा.मिलिंद नरोटे यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात बॉल बॅडमिंटन, सॉफ्ट बॉल, बेसबॉल आणि मिनी गोल्फ यांसारख्या खेळांचे प्रशिक्षण तरुण खेळाडूंना मिळणार आहे.

25 मे 2026 पर्यंत चालणाऱ्या या अॅडव्हान्स लेवल स्पोर्ट समर कॅम्पच्या उद्घाटनप्रसंगी विद्यापीठाच्या सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॅा.प्रशांत जाकी उपस्थित होते.

यावेळी मागील वर्षी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या जिल्ह्याचा नावलौकिक वाढविणाऱ्या गुणवंत खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. या खेळाडूंचा प्रवास नव्या खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरेल. गडचिरोलीच्या खेळाडूंमध्ये नैसर्गिक गुणवत्ता असून 2036 च्या ऑलिम्पिकमध्ये आपल्या जिल्ह्याचा खेळाडू भारतासाठी पदक जिंकेल, या जिद्दीने आपल्याला तयारी करायची आहे, असे प्रतिपादन यावेळी आ.डॅा.नरोटे यांनी केले.

खेळाडूंसाठी जिल्हा स्टेडियमवर अद्ययावत बॅडमिंटन कोर्ट व इतर सुविधांचे लोकार्पण लवकरच होईल. तसेच, जिल्ह्यात ‘स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया’चे केंद्र कार्यान्वित करण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू असून, गडचिरोलीला ‘स्पोर्ट्स हब’ बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,असेही डॅा.नरोटे म्हणाले.

कॅम्पच्या उद्घाटनप्रसंगी अतिथी म्हणून सुरेश लडके, नगरसेविका ज्ञानेश्वरी धंदरे, राष्ट्रीय बॅाल बॅडमिंटन खेळातू तथा स्टेट बँकेचे व्यवस्थापक मंगेश सोनटक्के, माजी नगरसेवक अनिल पोहणकर, क्रीडा मार्गदर्शन सुप्रसिद्ध बडकेलवार, दत्तू सुत्रपवार, गोंडवाना सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य ओमप्रकाश संग्रामे, बॅाल बॅडमिंटन फेडरेशन आॅफ इंडियाच्या कार्यकारी सदस्य प्रा.रुपाली पापडकर, आहार तज्ज्ञ रमण गागापुरवार, कपिल बागडे, जिल्हा कबड्डी संघटनेचे सहसचिव धनराज पोटावी, तसेच समर कॅम्पचे आयोजक प्रा.ऋषीकांत पापडकर आदी उपस्थित होते.