तुमच्या घरावर सोलर सिस्टिम बसवली का? ७८ हजारापर्यंत अनुदानासह मोफत वीज

लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन

गडचिरोली : घराच्या छपरावर रूफ टॉप सोलर सिस्टिम बसवून 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळविण्यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत 78 हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळत आहे. वीज ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळाच्या मुख्य अभियंत्यांनी केले आहे.

वीज ग्राहकांना मोफत वीज मिळवून देणाऱ्या या योजनेची अंमलबजावणी तातडीने करण्याची सूचना ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणला केली होती. त्यानुसार प्रक्रिया महावितरणकडून सुरू आहे. रूफ टॉप सोलर सिस्टिमसाठी केंद्र सरकारकडून वीज ग्राहकाला एका किलोवॅटसाठी 30 हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी 60 हजार रुपये, तर 3 किलोवॅटसाठी 78 हजार रुपये अनुदान थेट दिले जाणार असल्याचे महावितरणकडून कळविण्यात आले. वीज ग्राहकांनी कितीही क्षमतेची रूफ टॉप सोलर सिस्टिम बसविली तरी जास्तीत जास्त एकूण अनुदान प्रतीग्राहक 78 हजार रुपये इतके निश्चित केले आहे.

महाराष्ट्रात वीज ग्राहकांना सोलर सिस्टिम बसविण्यासाठी महावितरण मदत करते. ग्राहकांनी https://pmsuryaghar.gov.in या राष्ट्रीय पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे. पीएम सूर्यघर नावाचे मोबाईल ॲपही यासाठी उपलब्ध आहे. देशभरात एक कोटी घरांसाठी ही योजना राबविली जाणार आहे. राज्यातील ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

एक किलोवॅट क्षमतेच्या रूफ टॉप सोलर सिस्टिममधून दररोज सुमारे चार युनिट अर्थात दरमहा सुमारे 120 युनिट वीज तयार होते. महिना दीडशे युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या कुटुंबाला दोन किलोवॅटपर्यंतच्या क्षमतेची रूफ टॉप सोलर सिस्टिम पुरेशी आहे. दरमहा दीडशे ते तीनशे युनिट वीज वापर असणाऱ्या कुटुंबासाठी दोन ते तीन किलोवॅट क्षमतेची सिस्टिम योग्य ठरते.

घराच्या छतावर रूफ टॉप सोलर वीजनिर्मिती प्रकल्प बसवून सौरऊर्जेचा वापर करून वीज निर्मिती करायची व ती वीज घरी वापरून विजेची गरज पूर्ण करायची, अशी ही योजना आहे. यामध्ये गरजेपेक्षा अधिक वीजनिर्मिती झाल्यामुळे वीज बिल शून्य येते. अर्थात वीज मोफत मिळते व जास्तीची वीज महावितरणला विकून उत्पन्नही मिळवता येते.