चामोर्शी : ढिवर-भोई समाज मंडळ सगनापूर यांच्या वतीने आयोजित महर्षी वाल्मिकी ऋषी मूर्ती प्राणप्रतिष्ठा व ढिवर समाज मंदिराच्या लोकार्पणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. हा सोहळा माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
याप्रसंगी जेष्ठ नेते मनमोहन बंडावार, भाजपचे तालुका महामंत्री संजय खेडेकर, अडते संघटनेचे अध्यक्ष योगेश लोडे, जेष्ठ नेते परशुराम ठाकूर, भोई समाजाचे अध्यक्ष विकास शेंडे, उपाध्यक्ष मुखरेश्वर शेंडे, सचिव रविंद्र शेंडे, बूथ प्रमुख सुभाष चुनारकर, मुखरु झबाडे, रोशन भोयर तसेच अनेक मान्यवर व समाजबांधव मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते. संचालन हरिश गेडाम यांनी केले.
या कार्यक्रमासाठी मा.खा.डॉ.अशोक नेते यांचे गावात ढोलताशाच्या गजरात, फटाके उडवत आणि महिलांनी औक्षण करत स्वागत केले. संपूर्ण गावाने सामूहिक सहभागाने स्वागतयात्रा काढली.
याप्रसंगी बोलताना डॉ.नेते म्हणाले, ‘महर्षी वाल्मिकी हे रामायणाचे रचनाकार आणि ढिवर-भोई समाजाचे आराध्य दैवत आहे. समाजाच्या एकतेचे प्रतीक असलेल्या या मंदिराचे उद्घाटन करण्याचा मला सन्मान लाभला, ही आनंदाची गोष्ट आहे. समाजाच्या विकासासाठी यशवंतराव चव्हाण वसाहत योजनेत 440 घरकुले मंजूर झाली असली, तरी निधी अजून मिळालेला नाही. निधी उपलब्धतेसाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहे. केंद्र व राज्य सरकार गरीब, वंचित समाजाच्या हितासाठी कटिबद्ध आहे, असे ते म्हणाले. मंदिराच्या उभारणीमुळे संपूर्ण ढिवर-भोई समाज एकत्र आला हे सामाजिक एकतेचे प्रतीक आहे. या एकतेतूनच विकास साधला जाईल, असे मा.खा.नेते म्हणाले.