Home दैनंदिन बातम्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जिल्हा महाग्रामसभेने दिला पाठिंबा

आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जिल्हा महाग्रामसभेने दिला पाठिंबा

अपर आयुक्तांनाही दिले निवेदन

गडचिरोली : आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या वतीने आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त कार्यालयासमोर सुरू असलेल्या साखळी उपोषणाला काल (दि.21) गडचिरोली जिल्हा महाग्रामसभेने पाठिंबा दिला. आंदोलकांच्या मागण्या मान्य करण्यासाठी अपर आयुक्त आयुषी सिंह यांना निवेदनही सादर केले.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील सोयी, आश्रम शाळांमधील समस्या, प्रवेश प्रक्रियेची समस्या यासह आणखी काही विषयांबाबत चर्चेसाठी जिल्हा महाग्रामसभेचे अध्यक्ष नितीन पदा, सचिव शिवाजी नरोटे, डॅा.साईनाथ कोडापे, दलसू तिम्मा, केसरी मट्टामी, देवाजी पदा, देवीदास मट्टामी, कुंदा किरंगे, साधना मडावी, वर्षा पदा, सत्यवान सीडाम, पुरुषोत्तम किरंगे, संजय गावडे, शंकर चिंतुरी, श्रीनिवास मडावी, ईजामशाय काटेगे, सियाराम हलामी आदींचे शिष्टमंडळ यावेळी उपस्थित होते.

मागील 10 दिवसांपासून सुरु असलेल्या या उपोषणाची आदिवासी विकास मंत्र्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे या उपोषणात महाग्रामसभा आदिवासी विद्यार्थ्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही विद्यार्थ्यांना देण्यात आली.